कर्जमाफीवरून आता बुद्धिभेद करू नका!
By admin | Published: June 26, 2017 01:57 AM2017-06-26T01:57:44+5:302017-06-26T01:57:44+5:30
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे, म्हणूनच आम्ही राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे, म्हणूनच आम्ही राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. ही कर्जमाफी एकूण ३४ हजार २२ कोटी रुपयांची असेल. शासनाच्या या निर्णयामुुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. आता कुणीही कर्जमाफीच्या विषयावरून बुद्धिभेद न करता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रविवारी मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, गौरवमूर्ती मा. गो. वैद्य, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख व परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांना ‘जीवन गौरव’ तर लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक गजानन जानभोर यांना ‘ग. त्र्यं. माडखोलकर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर, सुनील चावके, कार्तिक लोखंडे, चंद्रकांत सामंत, रश्मी पुराणिक, विनोद जगदाळे, राजन वेलकर व गो. पी. लांडगे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे जिल्हा पत्रकार संघ व रामटेक तालुका पत्रकार संघाचा सन्मान करण्यात आला. सध्या माझे वय ९४ वर्षे आहे. आपण १०० वर्षे जगावे अशी माझी इच्छा होती. परंतु आता पुढे जगावे वाटत नाही. मृत्यू माझा मित्र आहे. त्याने लवकर यावे, मी त्याचे स्वागत करील, अशी हळवी भावना मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केली.
व्हॉट्सअॅप पत्रकारिता धोकादायक-
आजच्या सोेशल मीडियाच्या काळात पत्रकारितेची माध्यमे बदलत आहेत. आता तर व्हॉटस्अॅप पत्रकारिता जोरात आहे. आलेल्या पोस्टची शहानिशा न करता बेधडक पुढे पाठवली जात आहे. कोण पुढे लवकर पाठवतो ही स्पर्धाही जीवघेणी आहे. परंतु अशा पद्धतीच्या पत्रकारितेमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून ते कसे टाळता येईल याचा विचार व्हायला हवा, याकडेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.