लक्ष वेधण्यासाठी वक्तव्य करीत नाही
By admin | Published: April 21, 2015 02:08 AM2015-04-21T02:08:16+5:302015-04-21T02:08:16+5:30
साहित्य संमेलन किंवा कोणत्याही विषयावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी वक्तव्य करीत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही.
मुंबई : साहित्य संमेलन किंवा कोणत्याही विषयावर इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी वक्तव्य करीत नाही. माझ्याकडे तितका वेळही नाही. जे खरे आहे तेच मी बोलतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी नागपूर येथे नेमाडेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते बोलत होते.
साहित्य अकादमी आयोजित ‘पश्चिम भारतीय भाषेतील साहित्यात नियतकालिकांचे योगदान’ या विषयावर सोमवारी परिसंवाद पार पडला. या परिसंवादात या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि मराठी सल्लागार समितीचे संयोजक प्रा. भालचंद्र नेमाडे, कोकणी व पश्चिमी भाषा सल्लागार समितीचे संयोजक तानाजी हलर्णकर यांची मुख्य उपस्थिती होती.
कोणत्याही प्रकारची माहिती एका ठिकाणी संग्रहित केली गेली पाहिजे, जेणेकरून वाचक त्या माहितीपर्यंत सहज पोहोचू शकतील, असे मत त्यांनी मांडले. अतोनात समीक्षेने साहित्याचा ऱ्हास होतो़ त्यामुळे लेखन करताना स्वत:मधील समीक्षक जागा ठेवूनच लेखन केले गेले पाहिजे, अशी आग्रही भूमिका नेमाडेंनी मांडली.
मिर्झा गालिब यांच्या निवडक शायरींचा वापर करीत त्यांनी लेखन कसे असावे, याबद्दलही प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)