पेशाला गालबोट नको!

By admin | Published: October 9, 2016 12:19 AM2016-10-09T00:19:42+5:302016-10-09T00:19:42+5:30

औरंगाबाद येथे शिक्षक आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे शिक्षकांवर लाठ्याकाठ्या चालवायला आवडत नाही.

Do not mess with the profession! | पेशाला गालबोट नको!

पेशाला गालबोट नको!

Next

मुंबई : औरंगाबाद येथे शिक्षक आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला ही लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही सरकारला अशा प्रकारे शिक्षकांवर लाठ्याकाठ्या चालवायला आवडत नाही. प्रत्येकाच्या मागण्या असतात. त्यावर चर्चा करता आली असती. मात्र ज्या पद्धतीने शिक्षकांच्या आंदोलनात शिवीगाळ, नारेबाजी आणि दगडफेक झाली, त्याचे समर्थन करता येणार नाही. आजही समाजात शिक्षकाचे स्थान वरचे समजले जाते. शिक्षकांच्या उच्च दर्जाला गालबोट लागेल असे प्रकार घडता कामा नयेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षक आंदोलनातील अपप्रकारांवर नाराजी व्यक्त केली.
शनिवारी, नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राहुल नार्वेकर यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी राज्यातील १०९ शिक्षकांना २०१५-१६ सालचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, १५ वर्षांपासूनची शिक्षकांची मागणी विनोद तावडे यांनी पूर्ण केली. २० टक्के अनुदान देताना घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याचे कोणाला वाटल्यास त्याचा फेरविचार करता आला असता.
मात्र आंदोलनाच्या निमित्ताने जो व्यवहार पाहायला मिळाला त्याचे समर्थन करता येणार नाही. गोंधळ घालणारे शिक्षक असूच शकत नाहीत. काही संस्थाचालकांनी आंदोलनात बाहेरची माणसे घुसविली असण्याची शक्यता बोलून दाखविली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांचे समाजात जे स्थान आहे, त्याला कमीपणा आणता कामा नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सलग १० वर्षे शिक्षणात तेराव्या आणि चौदाव्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राने अवघ्या एका वर्षात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ‘लर्निंग आऊटकम’मध्ये १० टक्क्यांनी सुधारणी झाली. तब्बल १८ हजार शाळा या १०० टक्के लर्निंग आऊटकमवाल्या झाल्या आहेत. न भूतो न भविष्यति असे हे यश शिक्षण विभागाने अवघ्या एका वर्षात मिळविल्याचे सांगून फडणवीस यांनी शिक्षण विभागाचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. आगामी काळात तंत्रज्ञान आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, यंदा पुरस्कारासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. सुरुवातीला काही जणांनी या पद्धतीवर टीका केली. मात्र, ज्यांना स्वत:च्या कर्तृत्वावर पुरस्कार मिळेल असा विश्वास होता त्या सर्वांनी याचे स्वागत केले.
आॅनलाइन पद्धतीमुळे शिफारसींच्या आधारे होणारी निवड बंद झाली. त्यामुळे इथे जे १०९ आदर्श शिक्षक बसले आहेत ते सारे प्रयोगशील शिक्षक असल्याची भावना तावडे यांनी व्यक्त केली.
जागतिक दर्जाची शिक्षणप्रणाली राज्यात आणण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या वर्षात काही शिक्षक स्वखर्चाने शिक्षणातील जागतिक प्रयोग पाहून येणार आहेत. मात्र ज्यांना असा प्रवास शक्य नाही त्या सर्वांसाठी आदर्श जागतिक शिक्षणाबाबतची चित्रफीत आणि सादरीकरण तयार करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

१0९ शिक्षकांना पुरस्कार
यंदा १०९ जणांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात प्राथमिक (३८), माध्यमिक (३९), आदिवासी भागातील प्राथमिक (१९), क्रीडा आणि कला (२), स्काऊट व गाईड (२), अपंग (१) शिक्षकांचा समावेश आहे. तर, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने ८ जणांना सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: Do not mess with the profession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.