वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटू नका - विराट कोहली
By Admin | Published: April 22, 2016 05:45 PM2016-04-22T17:45:53+5:302016-04-22T17:45:53+5:30
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील आभाळमाया वृद्धाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.
पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनचे अमित भोसले, आभाळमाया वृद्धाश्रमाच्या संस्थापिका डॉ अपर्णा देशमुख या वेळी उपस्थित होत्या. विराट कोहली फाउंडेशन व पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग वृद्धाश्रमाला आर्थिक मदतही देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला, घरातील वडिलधा-या व्यक्तींची काळजी घेणे हे कुटुंबातील सदस्यांचे व समाजाचे देखील कर्तव्य आहे. मात्र अनेकजण या वडीलधा-या व्यक्तींना ओझे समजून दूर लोटतात. असे करणे चुकीचे आहे.
डॉ. अपर्णा देशमुख यांनी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमात नातलगांनी दूर सारलेल्या ५७ वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यांची संपूर्ण व्यवस्था या वृद्धाश्रमात करण्यात आलेली आहे. ही संस्था २०१० साली सुरू झालेली असून कोणत्याही सरकारी अथवा संस्थेच्या मदतीशिवाय सुरू आहे. डॉ. अपर्णा यांच्या कमाईतूनच या संस्थेचा सर्व खर्च उचलला जातो. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व सुरेंद्र मोहिते यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.