...तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही - नारायण भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 05:11 AM2016-12-23T05:11:33+5:302016-12-23T05:11:33+5:30
विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे
मुंबई : विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी अशीच सुरू राहिली तर तिसऱ्या महायुद्धाची गरज नाही, असे मत मुंबई विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉ. नारायण भोसले यांनी बुधवारी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात व्याख्यानात व्यक्त केले.
इतिहास संशोधन मंडळातर्फे बुधवारी ‘राणीची बाग काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी भोसले बोलत होते. या वेळी इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष दत्ता पवार उपस्थित होते. मनुष्य स्वत:च्या फायद्यासाठी निसर्गाचे अतोनात नुकसान करत आहे, याचे दुष्परिणाम सारे जग अनुभवत आहे. हेच एक दिवस जगाच्या विनाशाचे कारण बनणार आहे. भोसले यांनी मोगल काळापासून देशभरात उभारण्यात आलेल्या बागांविषयीची माहिती दिली. मोगल, ब्रिटिशांनी बागा का आणि कशा उभारल्या याविषयी इत्थंभूत माहिती देताना ते म्हणाले की, ब्रिटिशांचे वास्तव्य भारतात असताना त्यांनी देशाचा सखोल अभ्यास केला. देशाचे हवामान, वन्यजीव, माती, लोकसंख्या, संस्कृती, खाद्यसंस्कृती, आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानुरूप देशात वास्तू उभारल्या. त्यात बागांचाही मोठा वाटा होता. (प्रतिनिधी)
पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थ
स्वातंत्र्यानंतर भारताने मात्र देशाचा अभ्यास परिपूर्ण केला नाही त्यामुळेच राणीबागेत परदेशातून आणलेल्या पेंग्विनची काळजी घेण्यास प्रशासन असमर्थ ठरले. ३५ अंशाहून अधिक तापमान असलेल्या मुंबईत पेंग्विनची योग्य काळजी घेतली असती तर पेंग्विनवर मृत्यू ओढावला नसता, अशी खंत भोसले यांनी व्यक्त केली.
राणीची ‘बाग’ उत्कृष्ट प्रयोगशाळा
राणीची बाग ही केवळ बाग नसून तेथील वनस्पती उद्यान ही एक प्रयोगशाळा आहे. यात ८५३ जातीच्या वनस्पती, २८६ प्रकारचे मोठे वृक्ष
आहेत. दररोज ३ हजारांहून अधिक नागरिक राणीबागेला भेट देतात. या वनस्पतींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन भोसले यांनी केले.
मुंबईची परिस्थिती बिकट
जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगभरातील ९० टक्के लोक हे निसर्गाच्या असुंतलनामुळे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांनी त्रस्त आहेत. अहवालानुसार दर एक हजार माणसांमागे तीन एकर जमीन हिरवी असायला हवी तरच मानवी आरोग्य चांगले राहील. मात्र मुंबईत एक हजार माणसांमागे फक्त ०.००३ एवढीच जमीन हिरवी आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.