जैतापूर प्रकल्पाला विरोध नको- मोदींच्या सेना खासदारांना सूचना
By Admin | Published: May 13, 2015 04:58 PM2015-05-13T16:58:01+5:302015-05-13T17:43:07+5:30
जैतापूर प्रकल्पाला विरोध करू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना खादारांना दिल्याचे समजते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - जैतापूर प्रकल्पाला विरोध करू नका, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना खादारांना दिल्याचे समजते. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पामुळे देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक येईल, त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करून विकासाला विरोध करू नका असेही मोदींनी खासदारांना सांगितल्याचे समजते.
पंतप्रधान मोदी उद्यापासून चीनच्या दौ-यावर जाणार आहेत, तत्पूर्वी त्यांनी आज दुपारी सेना खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबत चर्चा केली. मी काही या खात्यातील तज्ज्ञ नाही नाही, त्यामुळे या प्रकल्पाचा प्रस्ताव संबंधित खात्याकडे पाठवून, त्यातील मुद्दे तपासून मगच पुढचा निर्णय घेण्यात येईल असेही मोदींनी सांगितले.
देशातील सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्माण करणा-या जैतापूर प्रकल्पातून होणाऱ्या रेडिएशनमुळे भातशेती, बागायती, मासेमारीसह मानवी जीवनावर दुष्परिणाम होतील, या भीतीने येथील जनतेचा प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. शिवसेनेनेदेखील याच मुद्द्यावरुन प्रकल्पाला प्रखर विरोध दर्शवला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात अरेवा आणि एल अॅण्ड टी या कंपनीशी करार करून जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामाला चालना दिली होती. याच पार्श्वभूमीवर सेना खासदार व पंतप्रधानांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेे होते.