''राज्यात नागरिकत्व कायदा संमत करू नका''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:59 AM2020-01-08T05:59:03+5:302020-01-08T05:59:13+5:30

देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा संमत करू नका.

Do not pass citizenship law in the state | ''राज्यात नागरिकत्व कायदा संमत करू नका''

''राज्यात नागरिकत्व कायदा संमत करू नका''

Next

मुंबई : देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात नागरिकत्व कायदा संमत करू नका. समाज दुभंगण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. लोकशाही पद्धतीने कायदे आणण्याचे साहस या हुकूमशाहीत नसल्यामुळे अशा पद्धतीने दबाव आणून षड्यंत्र रचले जात आहे, असे परखड मत लेखक-साहित्यिक आणि कलावंतांनी व्यक्त केले. या आंदोलनाच्या निमित्ताने राज्यात नागरिकत्व कायदा संमत करू नका, अशी मागणी करणारे निवेदन राज्य शासनाला देणार आहे.
राज्यातील नियतकालिके, लेखक, साहित्यिक व कलावंतांनी मिळून मंगळवारी आझाद मैदानात नागरिकत्व कायदा रद्द करण्याविषयी शांततापूर्ण आंदोलन केले. या आंदोलनाचे आयोजन साधना साप्ताहिक, मुक्त शब्द, खेळ, परिवर्तनाचा वाटसरू, सेक्युलर व्हिजन, सजग, अक्षर, सर्वधारा, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, मराठी कवी-लेखक संघटना, परिवर्तनाचा मुराळी, ऐसी अक्षरे, अांदोलन पत्रिका आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका यांनी केले होते. या आंदोलनात कवी-अभिनेता किशोर कदम, साहित्यिका नीरजा, प्रज्ञा पवार, कॉम्रेड सुबोध मोरे, साहित्यिक हरिश्चंद्र थोरात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्यिक गणेश विसपुते, विधिज्ञ नीता कर्णिक, संदेश भंडारे, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या आशालता कांबळे आदींनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी देवीप्रसाद मिश्र यांची ‘सुबह सवेरे’ ही कविता वाचून दाखवली. त्या म्हणाल्या की, सर्वत्र अस्वस्थ वातावरण आहे. संपूर्ण राष्ट्र आगीच्या खाईत लोटण्याचे षड्यंत्र सुरू आहे, अशा वेळेस लेखक-कवी-साहित्यिकांनी सहभाग घेतला आणि वैचारिक पाऊल उचलले ही समाधानाची बाब आहे. भटक्या-विमुक्तांकडे कागदाचे संसाधन उपलब्ध असण्याची चैन नाही. त्यामुळे भविष्यात मुस्लीम समुदायानंतर दलित, वंचित आणि स्त्रियांचा बळी जाणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र थोरात यांनी सांगितले की, एकूण मराठी साहित्याच्या पर्यावरणामध्ये गेली काही वर्षे जे वातावरण आहे, त्यात वेगाने बदल घडत आहे. आजचे वातावरण हे राजकीय भान असणारे आहे. ज्याचा मराठी साहित्यविश्वाशी संबंध आहे, लिहिणाऱ्या माणसाला राजकीय कृती करता येत नाही, असा समज असतो. मात्र यापूर्वी ‘पुरस्कार वापसी’च्या घटनेत सक्रिय सहभाग होता. मागच्या काही काळात लिहिणे अवघड होत आहे. सध्याच्या वातावरणात ‘माणूस’ महत्त्वाचा राहिलेला नाही, माणसावर जन्मत:च शिक्का मारायचे काम आताचे सरकार करत आहे, हे घटनेला धरून नाही. माणसाचे कागदात रूपांतर करण्याचे घटनाविरोधी काम दबाव आणून केले जात आहे, मात्र याविरोधात हा उभारलेला लढा भविष्यात व्यापक करूया, असे आवाहन त्यांनी केले.
>देशावर आलेले मोठे संकट
सध्याच्या वातावरणामुळे सर्वत्र अस्वस्थ आणि नकारात्मक वातावरण आहे. नागरिकत्व कायद्याच्या निमित्ताने देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. देशावर आलेले हे मोठे संकट आहे. गेल्या ७० वर्षांत आपल्या देशाने जे कमावले आहे, ते आता धूळधाण होते आहे. आतापर्यंत आपल्या देशात एकही कायदा धर्माच्या आधारावर आलेला नाही, त्यामुळे भविष्यातही आपण ही परिस्थिती येऊ द्यायची नाही. राजकारणात ज्याप्रमाणे संख्याबळ महत्त्वाचे असते, त्याप्रमाणे आपल्या विचारांची ताकद महत्त्वाची आहे. समाजातील ज्या घटकांत या कायद्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहे, त्यांचे विचार बदलण्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी.
- लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष
>‘आम्ही कागद दाखविणार
नाही’चा निर्धार
येत्या काळात केंद्र शासनाच्या वतीने जात-पात-धर्माची माहिती घेण्यास दरवाजावर कुणी आल्यास त्यांना ‘आम्ही कागद दाखविणार नाही’ असा निर्धार आंदोलनातील सहभागी लेखक-कलावंत आणि साहित्यिकांनी केला. त्याचप्रमाणे, भविष्यात हा निर्धार समाजाच्या तळागाळात रुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी आर्वजून नमूद केले.
>विद्यार्थ्यांना पाठिंबा
देशाच्या विविध
विद्यापीठांमध्ये घडणाºया घटनांच्या पार्श्वभूमीवर
विद्यार्थी प्रेरणा आहेत. विद्यार्थी हा घटक भविष्यातील आश्वासक चेहरा आहे, असे म्हणत दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील भ्याड हल्ल्याचा आंदोलकांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
याखेरीज, विद्यार्थ्यांच्या आवाजाला लेखक-साहित्यिक आणि कलावंतांचा पाठिंबा असल्याचेही जाहीर केले.

Web Title: Do not pass citizenship law in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.