राम मंदिरावरून राजकारण करू नका!; अयोध्येला निघालेल्या शिवसेनेचे संघाने टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 05:04 AM2018-11-01T05:04:07+5:302018-11-01T05:05:09+5:30
राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला.
मीरा रोड (ठाणे) : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी तेथील जमीन ताब्यात घेऊन मंदिर उभारणी करायची, इतकाच विषय शिल्लक असून केंद्र सरकारने जमीन हस्तांतरित करून आपले वचन पूर्ण केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण केले जात आहे. मंदिराच्या विषयाला राजकीय व धार्मिक स्वरूप देऊ नये, असा टोला वैद्य यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळून लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत.
भार्इंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत बुधवारपासून संघाची अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची तीन दिवसांची बैठक सुरू झाली. शुक्रवार, २ नोव्हेंबर रोजी या बैठकीची सांगता सरसंघचालक मोहन भागवत आणि कार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होईल. रायगडावरील नगारखान्याच्या प्रतिकृतीचे प्रवेशद्वार उभारण्यात आले असून सभागृहाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला आहे. बैठक सुरू होण्यापूर्वी सरसंघचालक भागवत यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहिला. बैठकीसाठी देशभरातून ३५० प्रतिनिधी दाखल झाले आहेत. संघाशी संलग्न भाजपासह एकूण १४७ संघटना असून त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचा आढावा व त्यावर विचारमंथन बैठकीत केले जाणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही चिंतन होण्याचे संकेत प्राप्त झाले. संघाच्या विस्ताराचा, संघ कुठे कमी आहे, त्या ठिकाणी संघ कसा वाढवायचा, यावर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!
आपत्तीमध्ये स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातात. पण, त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नसते. त्यांना प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. देशात संघ स्वयंसेवकांची संख्या वाढत आहे. सुमारे दीड लाख स्वयंसेवकांचे देशभरात कार्य सुरू आहे. बैठकीत प्रत्येक प्रांतनिहाय आढावा घेतला जाईल, असे वैद्य म्हणाले.
‘निराधार आरोप करणे ही काँग्रेसची सवय’
सरदार वल्लभभाई पटेल हे संघाच्या विरोधात होते, या काँग्रेसच्या आरोपांवर वैद्य म्हणाले की, निराधार आरोप करणे, ही काँग्रेसची सवय आहे. ते कुठलेही आरोप सिद्ध करू शकत नाहीत. संघावर आरोप होत आले आहेत आणि प्रत्येक आरोपास उत्तर देण्याची गरज नाही.