मराठा समाजाच्या आरक्षणाचे राजकारण करु नये - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 09:46 PM2016-10-18T21:46:46+5:302016-10-18T21:52:39+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राजकारण करीत आहेत, मराठा आरक्षणाचे कोणीही राजकारण करु नये
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मराठा समाजाच्या आरक्षणावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राजकारण करीत आहेत, मराठा आरक्षणाचे कोणीही राजकारण करु नये. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविषयी झालेल्या सुनावणीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती पूर्णपणे खरी आहे. मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष या नात्याने मीच न्यायालयातील सुनावणीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती, यामधील एकही शब्द खोटा नाही अशी ठाम भूमिका मांडताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे.
नारायण राणे यांनी त्यावेळी मतांवर डोळा न ठेवता नीट अभ्यास करुन अहवाल सादर केला असता तर त्यांना आज असे खोटेनाटे आरोप करण्याची वेळ आली नसती. अशा शब्दात श्री.तावडे यांनी राणे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.
मराठा आरक्षणविषयी न्यायालयात शासनाने वेळ मागितली अशी चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली हा राणे यांचा दावा खोडून काढताना तावडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी न्यायालयातील सुनावणीची वस्तुस्थितीपर खरी माहिती मीच मुख्यमंत्र्यांना दिली. मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजु मांडणारे जेष्ठ वकील ॲङ थोरात आणि ॲङ कदम यांनी न्यायालयात सांगितले की, मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचे पुरावे आम्ही गोळा केलेले आहेत, या संदर्भातील 'क्वांटिफिकेशन डाटा' आमच्याकडे तयार आहे.
परंतु नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या जनगणनेनुसारची सविस्तर जातनिहाय माहिती आता उपलब्ध होणार आहे. ही माहिती विश्लेषण स्वरुपात उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पंतप्रधानांकडे विनंती केली आहे. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर आम्हाला अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सरकारच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. न्यायालयात आता प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आमची तयारी आहे. परंतु अधिकची माहिती उपलब्ध झाल्यानंतर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याची न्यायालयाने आम्हाला संधी द्यावी अशी विनंतीही सरकारच्या वतीने करण्यात आली. याच वेळी काही याचिकाकर्त्यांनी आम्हाला अधिकचा वेळ देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाच्या खंडपीठाने या सुनावणीला चार आठवडयाची वेळ दिली असे तावडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष काय घडले याची सविस्तर माहिती राणे यांनी घेतली असती तर बरे झाले असते असा टोलाही तावडे यांनी मारला.