माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका
By admin | Published: August 29, 2014 03:07 AM2014-08-29T03:07:24+5:302014-08-29T03:07:24+5:30
माझ्या वडिलांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना आता त्यांच्या मृत्यूनंतर पुळका आला आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता अशा खोट्या पुळक्यांना बळी पडणार नाही
राजेश शेगोकार, बुलडाणा
माझ्या वडिलांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना आता त्यांच्या मृत्यूनंतर पुळका आला आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता अशा खोट्या पुळक्यांना बळी पडणार नाही. माझ्या वडिलांनी मला संघर्षाचा वारसा दिला असून, हा वारसा सांभाळण्यास माझे खांदे समर्थ आहे, अशी घणाघाती टीका भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे पालवे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता गुरुवारी येथे केली.
‘लोकमत’मध्ये २४ आॅगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीवर भाष्य करून, आंदोलनाची भाषा त्यांनी या मुलाखतीमध्ये होती. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी त्यांना रोख-ठोक उत्तर दिले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर, भगवानगडाच्या प्रतिनिधी राधाताई सानप यांच्यासह डॉ.प्रितम व यशश्री मुुंडे, यात्रेचे समन्वयक सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. भर पावसातही प्रचंड गर्दी झालेल्या या सभेला पंकजा यांनी भावूक मार्गदर्शन केले. राज्यात महायुतीची सत्ता येण्याचे स्वप्न मुंडे साहेबांनी पाहिले होते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी आता संघर्ष यात्रा सुरू केली आहे. आता त्याच भगवान गडावरून मला त्यांचे स्वप्न साकार होणार आहे, हे दिसत असून, त्यासाठीच ही संघर्ष यात्रा असल्याचे पंकजा यांनी सांगितले. पंकजा याच मुंडे साहेबांच्या खऱ्या वारसदार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.