एकही जागा वाढवून देणार नाही
By admin | Published: September 15, 2014 02:25 AM2014-09-15T02:25:46+5:302014-09-15T02:25:46+5:30
भाजपाला एकही जागा वाढवून देणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील बैठकीत घेतली
संदीप प्रधान, मुंबई
भाजपाला एकही जागा वाढवून देणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरील बैठकीत घेतली. त्यानंतर लागलीच त्यांनी आपली मुख्यमंत्रीपदाची दावेदारी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. यामुळे भाजपा नेते दुखावले आहेत.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे शुक्रवारी रात्री मातोश्रीवर चर्चेला गेले होते. दोन्ही पक्षांनी वाटून घ्यायच्या ४३ विधानसभा मतदारसंघांची चर्चा सुरू झाली तेव्हा भाजपाने गोंदिया मतदारसंघाचा उल्लेख करून तेथील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या येथील भाजपाची ताकद ही शिवसेनेपेक्षा कशी अधिक आहे, याचे दाखले देऊन या जागेवर दावा केला. अशा तीन-चार जागांची चर्चा झाल्यावर शिवसेनेकडून या चर्चेत सहभागी झालेल्या अनिल देसाई, विनायक राऊत यांनी अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ताकद दाखवून जागेवर दावा करण्यास आक्षेप घेतला. जागावाटपाची संख्या निश्चित केल्यानंतर या ४३ विधानसभा मतदारसंघांची चर्चा आपण नंतर करू, असे शिवसेनेचे नेते बैठकीत म्हणाले.
मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही ११९ जागा लढलो. यावेळी मित्रपक्षांना भाजपाने व शिवसेनेने प्रत्येकी नऊ या प्रमाणे १८ जागा द्यायच्या असल्याने भाजपा प्रत्यक्ष लढवीत असलेल्या जागा ११० होणार असल्याने एकूण जागा वाढवून १३५ पर्यंत देण्याची मागणी भाजपा नेत्यांनी केली. १२६ जागांपेक्षा कमी एकही जागा भाजपा घेणार नाही, असे हे नेते बैठकीत बोलले. त्यानंतर या चर्चेत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आले. भाजपाला आम्ही एकही जागा वाढवून देणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत भाजपा अधिक जागा लढणार तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला जास्त जागा हे सूत्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व प्रमोद महाजन यांनी ठरवले आहे. त्यामध्ये बदल करणे शिवसेनेला मान्य नाही, असे ठाकरे यांनी बजावल्याचे समजते. शिवसेनेने इतकी स्पष्ट भूमिका घेतल्यावर भाजपाचे नेते चर्चा सोडून परतले.