...तोपर्यंत वीज बिलाची वसुली करू नका; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा महत्त्वपूर्ण आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 04:54 PM2021-07-30T16:54:55+5:302021-07-30T16:58:21+5:30
पूरग्रस्त भागासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश
मुंबई: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला. अनेकांचे संसार पुरामुळे मोडून पडले. घरं पाण्याखाली गेल्यानं लोकांचं अतोनात नुकसान झालं. पूरग्रस्त भागातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. या परिस्थितीत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पूरग्रस्तांना मोठा दिलासा दिला आहे. पूरग्रस्त भागात वीज बिल वसुली करू नका, असे आदेश राऊत यांनी दिले आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर बिल भरण्यासाठी सवलत दिली जाईल, असं राऊत यांनी म्हटलं आहे. वीज बिल माफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय मंत्रिमंडळ घेऊ शकेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं नैसर्गिक संकटं येत आहेत. निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ व पुरामुळे वीज यंत्रणेचं खूप नुकसान झालं आहे. अनेकदा ऊर्जा विभागाला सर्वात आधी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. यावर उपाययोजना व संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी आपत्ती विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचं राऊत यांनी सांगितलं. कोकणात वारंवार नैसर्गिक संकटं येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचं कायमस्वरूपी तळ निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विनंती करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रत्नागिरी जिल्ह्यात २२ जुलैला झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे मुख्यत: चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात महावितरण व महापारेषणच्या यंत्रणांचे अतोनात नुकसान झालं आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीन राऊत यांनी आज चिपळूण तालुक्याला भेट दिली. पुरामुळे नादुरुस्त झालेले मीटर ग्राहकांना त्वरित बदलून देण्याचे निर्देश राऊत यांनी यावेळी महावितरणला दिलेत. भीषण पूरपरिस्थिती असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं त्यांनी यावेळी कौतुक केलं.