निष्कारण फायली फिरवत बसू नका : मुनंगटीवार
By admin | Published: May 6, 2017 04:14 AM2017-05-06T04:14:25+5:302017-05-06T04:14:25+5:30
वित्त विभागाकडे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर अधिक स्पष्टीकरणाची गरज असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घ्या, सर्व
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वित्त विभागाकडे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर अधिक स्पष्टीकरणाची गरज असेल तिथे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घ्या, सर्व शंकांचे निरसन करून घ्या, पण फायली विनाकारण फिरवत बसू नका, अशा शब्दांत वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी आज वित्त विभागातील अधिकाऱ्यांना समज दिली.
सह्याद्री अतिथीगृहात शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते. २०१७-१८च्या अर्थसंकल्पात घोषित विभागवार योजनांचा आढावा त्यांनी घेतला. अर्थसंकल्पात घोषित केलेल्या योजनावरील कार्यवाही लवकर पूर्ण झाल्यास त्या योजनांचे फलित अधिक स्पष्टपणे दिसून येते असे सांगून ते म्हणाले की, घोषित योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करून जिथे गरज आहे तिथे प्रस्ताव एक महिन्यात मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करावेत व ज्या योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज नाही त्या ठिकाणी विभागाने योजनेच्या अंमलबजावणीच्या कामास वेग द्यावा, असे ते म्हणाले.
स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा
केंद्र शासनाच्या ज्या योजनांमधून राज्याला पैसे मिळणार आहेत त्या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. वित्त विभागाने यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा व या अधिकाऱ्याने केंद्रीय योजनांमधून राज्याला मिळणाऱ्या निधीच्या प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करा, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.