शपथेवर सांगा भ्रष्टाचार केला नाही
By admin | Published: February 17, 2017 03:38 AM2017-02-17T03:38:58+5:302017-02-17T03:38:58+5:30
हिंमत असेल तर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगावे की वीस वर्षांत मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केलेला नाही.
मुंबई : हिंमत असेल तर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगावे की वीस वर्षांत मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केलेला नाही. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला आहे, असे थेट आव्हान केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी शिवसेनेला दिले.
मुंबईतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांनी विलेपार्ले आणि रे रोड येथे प्रचारसभा घेतल्या. त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. स्वच्छ कारभाराची शपथ घेण्याची हिंमत शिवसेना दाखवू शकणार नाही. त्यांच्यासाठी राजकारण पैसे कमावण्याचे साधन बनले आहे. त्यांचे नगरसेवक आणि अधिकारी टक्केवारीत गुंतले आहेत. जोपर्यंत यांना हाकलले जात नाही, तोपर्यंत मुंबईचा विकास शक्य नाही. शिवसेनेने मुंबईच्या किनाऱ्याची वाट लावली. पण आम्ही मुंबईला सुंदर करणार, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. (प्रतिनिधी)
भाजपाला एकहाती सत्ता द्या...-
मुंबईचा सर्वांगीण विकास हवा असेल, भ्रष्टाचारमुक्त महापालिका हवी असेल तर भाजपाला एकहाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले. युती तोडताना आमची २५ वर्षे सडल्याचे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण, युतीमध्ये दोघांचा फायदा झाला.
भाजपाबरोबर युती नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला नसता. नागपूर महापालिकेत भाजपाने जो पारदर्शी कारभार केला तो शिवसेनेला वीस वर्षे जमला नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच रे रोड येथील सभेत त्यांनी मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास करणार असल्याचे सांगितले.