‘मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:12 AM2017-10-06T05:12:53+5:302017-10-06T05:13:23+5:30
शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले
औरंगाबाद : शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले. आता समाजाच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिला.
शिवाई मराठा महिला मंडळ व मराठा बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मराठा बिझनेस महाएक्स्पो २०१७ चे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले.
चव्हाण म्हणाले, आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतीलच असे नाही. शिष्यवृत्ती मिळाली तरी आजच्या शिक्षणाचा खर्च कमी नाही. त्यामुळे तरुण-तरुणींनी उद्योग, व्यापाराकडे वळले पाहिजे. खा. दानवे यांना उद्देशून ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पूर्ण ताकद लावा. मतभेद असतील तर ते दूर करून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आणा.
नवे पक्ष को.आॅप. सोसायटींसारखे
दररोज नवीन पक्ष येत आहेत. मागील आठवड्यातच राज्यात एक नवीन पक्ष निर्माण झाला. पक्ष निर्माण करणे म्हणजे को. आॅपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर करण्यासारखे झाले आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.