तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 01:45 PM2024-01-15T13:45:59+5:302024-01-15T13:48:27+5:30

जे जे महाराष्ट्रातलं उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सर्वबाजूने सुरू आहे. म्हणजे थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असं राज ठाकरे यांनी सांगितले.

Do not sell your rightful land, Raj Thackeray appeals to Konkan people | तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन

तुमच्या हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर परत येणार नाही; राज ठाकरेंचं आवाहन

अलिबाग - काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केले, हे कलम म्हणजे तिकडे जाऊन जमीन विकत घेऊ शकत नाही. हिमाचल प्रदेश, आसाम, मिझोराम या प्रदेशात जमीन विकत घेऊन दाखवा. आपल्याकडे अंतर्गत अनेक राज्ये आहे जिथे मोठा उद्योग काढणार असाल तर जमीन मिळेल. परंतु इतर गोष्टींसाठी सरकारच परवानगी देत नाही. स्थलांतरीत कायदा वाचा. आज आपल्याकडे कायदा वापरला जात नाही. तुमच्याकडच्या जमिनी हातातून चालल्या आहेत.  अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही परंतु पुढच्या ४-५ वर्षात ती जाईल. त्यामुळे डोळे उघडा ठेवा.  तुमची हक्काची पायाखालची जमीन एकदा गेली तर ती परत येणार नाही अशा धोक्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासियांना दिला. 
 
अलिबाग येथे मनसेच्या जमिन परिषदेसाठी राज ठाकरे आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, बाकीचे कसे हुशारीने आपल्या राज्यात घुसतात त्याचा नीट विचार करा. आपल्या महाराष्ट्रावर होणारं जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींबाबत मला चर्चा करायची होती. मी गेले अनेक वर्ष पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई सगळीकडे सतत एकच गोष्ट सांगतोय. तुमच्या पायाखालची जमीन निघून चाललीय त्याचा अंदाज आपल्या मराठी माणसाला आहे का? बाकीच्या राज्यात त्यांचे नेते आधी त्यांच्या माणसांचा विचार करतात मात्र आपल्याकडे ते होत नाही. अलिबाग आणि आसपासच्या गावांमधील जमिनी संपल्या. पायाखाली तुमच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरीक नाही. जमीन तुमची आहे ती विकावी न नाही हा अधिकार तुमचा आहे. तुम्हाला त्या जमिनीचा मोबादला मिळतोय का, तुम्ही कोणाला जमीन विकताय, तो कोण आहे हे माहिती नसते. तुमच्याकडून १ रुपयात जमीन घेतली जाते त्यानंतर तिथे सरकारचा प्रकल्प येतो त्यानंतर ती जमीन १ हजारात विकली जाते. हा पैसा तुमचा आहे. ट्रान्स हार्बर सुरू झाला, रोरो सेवा सुरू झाली. तुमच्या जमिनी हातातून जाणार आहेत. रायगड जिल्ह्यात कोणते व्यवसाय येणार असतील तर तुम्ही पार्टनरशिप मागा. तुमच्या पुढच्या पिंढ्यांचा विषय संपतील. माझे घर इथेच, गावातच राहतोय. तुमच्या जमिनी कुणाच्या नावावर होतोयेत याचा आढावा घ्या. कर्जत, खालापूर, नेरळ हा सगळा पट्टा हातातून जातोय. तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहिले पाहिजे. 

तुम्ही महाराष्ट्रातील भूमिपुत्र आहात. राज्यकर्त्या मराठ्यांचा हाताखालची जमीन जातेय. तुम्हाला पोरकं करतायेत. तुमच्या पुढच्या पिढी बर्बाद करतायेत. तुमच्या जमिनी घेऊन तुम्हाला पोखरलं जातं. जे कुणी दलाल म्हणून फिरत असतील त्यांनी तुमच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. ते जसे शांतपणे आपल्याला पोखरतायेत आपणही तितक्या शांतपणे या गोष्टी वाचवल्या पाहिजे. तुम्ही आज दुर्लक्ष कराल परंतु कालांतराने माझ्यावर विश्वास ठेवाल. तेव्हा राज ठाकरे आपल्याकडे आला होता. त्याने सांगितले होते पण आपण लक्ष दिले नाही हे आठवेल. जे जे महाराष्ट्रातलं उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सर्वबाजूने सुरू आहे. म्हणजे थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखा असं राज ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, आज ज्या ज्या गावात तुम्ही आहात तिकडच्या तरुणांशी बोला. इथं उभे राहणारे उद्योग तुमचे हवेत. दुसरे उद्योग थाटणार तिथे तुम्ही नोकरी कशाला करताय? दुसरे इथं येऊन काम करणार असतील तर ते तुमच्या अटींवर झाले पाहिजे. आज पनवेलची अवस्था जाऊन बघा, भाषा बदलली. अलिबागची भाषा बदलायला वेळ लागणार नाही. मराठी राहणार नाही. तुम्ही हळूहळू हिंदीत बोलाल. मी ज्या धोक्याची सूचना देतोय ते मुंबईत झालंय. हे पुण्यात, ठाण्यात होतंय. ठाणे जिल्हा हा जगात एकमेव जिल्हा आहे जिथे सर्वाधिक बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या आहे. रायगड जिल्ह्यात महानगरपालिका १ आहे. ठाणे जिल्ह्यात ७ महापालिका आहेत. इथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली का? बाहेरुन रोज भरमसाठी लोक येतायेत त्यातून तिथली लोकसंख्या वाढली. तिथल्या नगरपालिका या महानगरपालिका झाल्या. आपल्यावर कुठल्या प्रकारचे आक्रमण होतंय हे लक्षात घेतायेत. हे सगळं लक्षात येईपर्यंत तुमच्या हातातून वेळ जाईल. त्यानंतर कपाळावर हात मारण्याची वेळ येईल अशी भीतीही राज ठाकरेंनी व्यक्त केली. 

Read in English

Web Title: Do not sell your rightful land, Raj Thackeray appeals to Konkan people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.