पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग नको
By Admin | Published: May 9, 2016 12:59 AM2016-05-09T00:59:31+5:302016-05-09T00:59:31+5:30
लोकसभेच्या निवडणुकांना अजून ३ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, नरेंद्र मोदी यांचे सरकार पडत नाही.
पुणे : लोकसभेच्या निवडणुकांना अजून ३ वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, नरेंद्र मोदी यांचे सरकार पडत नाही. त्यापूर्वीच पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? अशा चर्चा करून गुडघ्याला बाशिंग बांधू नये, असा टोला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर लगावला. या वेळी त्यांनी त्यांच्या पटट्ेवाला ते गृहमंत्रिपदापर्यंतचा प्रवास उलगडला.
डीएसके फाउंंडेशनच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांच्यासमवेत गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या वेळी उद्योगपती डी. एस. कुलकर्णी उपस्थित होते. गाडगीळ यांनी शिंदे यांना राजकारण, वैयक्तिक आयुष्य, साहित्य, कला, समाजकारण अशा विविध विषयांवर बोलते केले. तब्बल दीड तास हा गप्पांचा कार्यक्रम रंगला.
पंतप्रधानपदाचे नितीशकुमार हे प्रबळ दावेदार ठरू शकतील, असे विधान नुकतेच शरद पवार यांनी केले असल्याचा संदर्भ देऊन गाडगीळ यांनी शिंदे यांना पंतप्रधानपदाचे कोण चांगले उमेदवार ठरू शकतील, अशी विचारणा केली. त्या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘नितीशकुमारांबाबत पवार यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, मोदी सरकार पडत नाही तोपर्यंत गुडघ्याला बाशिंग बांधू नये.’’
अफजल गुरू याला फाशी देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मत काँग्रेसचेच माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदमबरम यांनी व्यक्त केले असल्याबाबत विचारणा केली असता सुशीलकुमार म्हणाले, ‘‘चिदंबरम यांनी असे मत व्यक्त केले की नाही ते माहीत नाही. मात्र, चिदंबरम प्रख्यात वकील होते. गुरू याला फाशी देण्याच्या निर्णयाचा रिव्हयू करायला कोणी अडविले नव्हते. राष्ट्रपतींनी एकदा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजाावणी करणे भाग असते. ’’
शरद पवार यांनी राजकारणात आणले, तर वसंतराव नाईक यांनी मंत्रिपदाची संधी दिली.
आजचा चपराशी उद्याचा मंत्री
होतो, हा लोकशाहीचा विजय आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)