वर्गीकरणांवर स्वाक्षरी करू नका
By admin | Published: June 9, 2016 12:46 AM2016-06-09T00:46:12+5:302016-06-09T00:46:12+5:30
८५ कोटी रुपयांचा निधी परस्पर वळविण्यात आल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.
पुणे : स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या प्रभागातील ८५ कोटी रुपयांचा निधी परस्पर वळविण्यात आल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या नगसेविकांनी बुधवारी सकाळी महापौर प्रशांत जगताप यांना घेराओ घातला. कदम यांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावावर महापौरांनी सह्या करू नयेत, अशी सूचना चव्हाण यांनी या वेळी महापौरांना केली.
स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये १८१ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये अश्विनी कदम यांना पूर्ण अंधारात देऊन अत्यंत नाट्यमयरीतीने त्यांच्या प्रभागातील ८५ कोटी रुपयांचा निधी परस्पर दुसऱ्या प्रभागात वळविण्यात आला. या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण, अश्विनी कदम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी सकाळी प्रशांत जगताप यांची भेट घेतली. परस्पर निधी वळविण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
माजी महापौर चंचला कोद्रे या वेळी बोलताना म्हणाल्या, ‘‘स्मार्ट सिटीअंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागांचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. या भागाकरिता अंदाजपत्रकामध्ये ठेवण्यात आलेला निधी इतर भागांकडे वर्ग करण्यात यावा. मात्र महिला नगरसेविकांच्या प्रभागातील निधीचे वर्गीकरण होता कामा नये. महिलांबाबत मुद्दामहून असे निर्णय घेतले जात आहेत.’’
स्थायी समितीमध्ये वर्गीकरणाच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी वंदना चव्हाण यांच्यासह पक्षाच्या नगरसेविका सकाळी महापालिकेत आल्या असताना सभागृहनेते बंडू केमसे व स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके अनुपस्थित राहिले.
महापौरांनी मात्र महिला नगरसेविकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
>कार्याध्यक्षांच्या
घरी घेतली धाव
अजित पवार यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी निरोप मिळाला नसल्याचे उत्तर दिले होते. मात्र त्यांना बैठकीचे निमंत्रण देऊनही त्यांनी असे उत्तर का दिले, याचा जाब विचारण्यासाठी शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्यासह महिला नगरसेविकांनी बुधवारी पाटील यांच्या घरी धाव घेतली. मात्र त्यांची श्रीकांत पाटलांशी भेट होऊ शकली नाही.
>महिला यापुढे अन्याय सहन करणार नाहीत
‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांना आदर, सन्मान दिला जातो, म्हणून आम्ही या पक्षात आलो आहोत. महिला नगरसेविका व पदाधिकारी यापुढे त्यांच्यावर होणारा अन्याय सहन करणार नाहीत. अश्विनी कदम यांच्या प्रभागातील काही निधी मागासवर्गीय योजना व महिलांसाठी देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र सभागृहनेत्यांनी कोणाशीही चर्चा न करता कदम यांना अंधारात ठेवून त्यांच्या निधीचे वर्गीकरण केले. याविरोधात सर्व महिला एकत्र आल्या असून यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही.’’
- खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस