मांझींना पाठिंबा देण्याचे पाप करु नका - उद्धव ठाकरेंचे भाजपाला खडे बोल
By admin | Published: February 16, 2015 10:13 AM2015-02-16T10:13:40+5:302015-02-16T12:53:05+5:30
राजकीय स्वार्थासाठी विकासकामातील कमिशनखोरीचे समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना समर्थन देण्याचे पाप करु नका असे खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहेत.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - राजकीय स्वार्थासाठी विकासकामातील कमिशनखोरीचे समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याचे पाप करु नका असे खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता बिहारमधील राजकीय संघर्षावरुन शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर टीका केली. विकासकामांसाठी कमिशन मिळत असल्याचा स्फोट बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांनी केला होता. हेच कमिशनबाज मुख्यमंत्री आता भाजपाच्या पाठिंब्यावर बिहार विधानसभेत बहुमत जिंकण्याची तयार करत आहे असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराचे खुले समर्थन करणारे, पक्षाचा आदेश न जुमानणारे मांझी हे मुख्यमंत्री झाल्यापासून अडाणी पद्धतीने वागत आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. भाजपा मांझी यांना नितीशकुमारांविरोधात खेळवत असून मांझींना समर्थन देणे म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेण्यासारखे आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.