बस्त्यावर अवाजवी खर्च नको!
By admin | Published: December 10, 2015 02:40 AM2015-12-10T02:40:34+5:302015-12-10T02:40:34+5:30
वाढत्या महागाईत लग्न म्हणजे वधुपक्षाची परीक्षाच असते. त्यात वधुपित्याची स्थिती बेताची असल्यास कठीणच. ग्रामीण भागात मानपानाला फार महत्त्व असते.
मोताळा (जि. बुलडाणा) : वाढत्या महागाईत लग्न म्हणजे वधुपक्षाची परीक्षाच असते. त्यात वधुपित्याची स्थिती बेताची असल्यास कठीणच. ग्रामीण भागात मानपानाला फार महत्त्व असते. हे सर्व ध्यानी घेऊन लग्नाच्या बस्त्यावर केल्या जाणाऱ्या अनावश्यक खर्च टाळण्याचा अभिनव ठराव, लिहा ग्रामपंचायतीने एकमुखाने मंजूर केला आहे.
लग्न समारंभात वर-वधुच्या वस्त्रांसह जवळच्या नातेवाईकांनाही मानपान दिला जातो. या मानपानात परस्परांकडून महागड्या वस्त्रांची अपेक्षा ठेवण्यात येते.
हा सोहळा मनासारखा झाला नाही, तर बरेचदा संबंधांमध्ये कटुता निर्माण होते. यावर उपाय म्हणून, विवाह सोहळ्यातील हा अवाजवी खर्च न करण्याचा ठराव, लिहा बु. ग्रामपंचायतने सोमवारी मासिक सभेत मांडण्यात आला.
नवनिर्वाचित सरपंच सुरेखा ईश्वर पाटील, माजी सरपंच ईश्वर पाटील, ग्रामसेवक शीतल गवई, ग्रा. पं. सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाह समारंभातील ‘बस्ता’ खरेदीसाठी किमान वीस ते पंचवीस हजारांचा अतिरिक्त ताण वधुपक्षावर पडतो.
या निर्णयामुळे किमान या गावातील लोकांचा हा खर्च वाचण्यास मदत होईल.
या संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा निर्णयही सरपंच सुरेखा ईश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत घेण्यात आला. (प्रतिनिधी)