शाळेत शिक्षकांना विनाकारण थांबवू नका - शिक्षण विभाग
By admin | Published: July 7, 2017 04:14 PM2017-07-07T16:14:17+5:302017-07-07T16:14:17+5:30
शाळा सुटल्यावर विनाकारण शाळेत शिक्षकांना थांबवू नका, असे आदेश आज शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना दिले
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 07 - शाळा सुटल्यावर विनाकारण शाळेत शिक्षकांना थांबवू नका, असे आदेश आज शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण निरीक्षकांना दिले असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांना नाहक दिला जाणारा त्रास आता थांबणार आहे.
याबाबत शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी १९ जून २०१७ रोजी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत बोरनारे यांनी राईट टू एज्युकेशन मधील शिक्षकांच्या कार्यभाराचा उल्लेख करून अनेक शाळा शिक्षकांना शाळा सुटल्यावर सुद्धा विनाकारण जादा वेळ थांबवत असल्याची तक्रार केली होती. तसेच अनेक शाळा शिक्षण हक्क कायद्याचा भंग करीत असल्याचे पत्रात नमूद केले होते.
या पत्राची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी तातडीने मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांना याबाबत शाळांना अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळच्या सत्रातील शाळा ७ ते १२.३० तर दुपार सत्रातील शाळा १२.३० ते ६ वाजेपर्यंत भरतात. सकाळ सत्रात अनेक शाळा दुपारी २ वाजेपर्यंत शिक्षकांना थांबवून ठेवतात तर दुपार सत्रात शाळा सुरू होण्याच्या आधी बोलावले जाते व थांबविले जात असल्याने शिक्षकांना नाहक त्रास होत होता. शिक्षण हक्क कायद्यात शिक्षकांच्या कार्यभाराबाबत स्पष्ट दिलेले असूनसुद्धा अनेक शाळा या कायद्याचा भंग करीत असून यापुढे मात्र शाळांना या आदेशाचे पालन करावे लागणार असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.