पैशासाठी विज्ञान अभ्यास नको
By admin | Published: January 5, 2015 06:40 AM2015-01-05T06:40:00+5:302015-01-05T06:40:00+5:30
धर्मातून नैतिकता येत असली तरी तिला विज्ञानाचा आधार पाहिजे आणि शुद्ध ज्ञान म्हणजे विज्ञान होय. म्हणून पैसे कमविण्यासाठी नाही
मुंबई : धर्मातून नैतिकता येत असली तरी तिला विज्ञानाचा आधार पाहिजे आणि शुद्ध ज्ञान म्हणजे विज्ञान होय. म्हणून पैसे कमविण्यासाठी नाही, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास करा, असे आवाहन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बालमित्रांना केले.
मुंबईत आयोजित १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेतील वांद्रे-कुर्ला संकुलातील बालविज्ञान मेळाव्यात कैलाश सत्यार्थी बोलत होते. ते म्हणाले, दिवा हा अंधकार दूर करतो. म्हणून आयुष्य दिव्यासारखे जगा, पुस्तकासारखे जगा़ कारण एक पुस्तक प्रकाशित होते तेव्हा एक दिवा प्रज्वलित होतो. आणि हिंसेला आयुष्यातून नेहमी दूर ठेवा; कारण जेव्हा बंदुकीची गोळी तयार होते तेव्हा एक जीव मरतो. आयुष्य समृद्ध करायचे असेल तर विज्ञानाची कास धरा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूर्णविराम विसरून जा. प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरे शोधा. संशोधक बना़ धर्मवादी नाही, तर विज्ञानवादी बना. समाजाच्या भल्यासाठी आपल्या अंगभूत कौशल्यांचा वापर करा. देश, धर्म या जाचातून मुक्त होत वैश्विक बना, क्षमाशील बना. (प्रतिनिधी)