विमानतळाला परस्पर कोणीही पाठिंबा देऊ नका
By admin | Published: September 22, 2016 02:07 AM2016-09-22T02:07:01+5:302016-09-22T02:07:01+5:30
प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून विरोध करावा.
राजेवाडी : राजेवाडी वाघापूर येथे होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून विरोध करावा. परस्पर कोणीही या विमानतळाला पाठिंबा देऊ नये; अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाघापूरचे माजी सरपंच बाजीराव कुंजीर व पुरंदर तालुका युवक काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष गणेश मेमाणे यांनी दिला आहे.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरंदरमधील विमानतळाच्या जागेला पसंती दिली असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना यामध्ये भागीदार करणार असल्याचे सांगितले असले, तरी या भागातील ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना अजिबात साधी विचारपूस न करता परस्पर निर्णय घेतला असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत विमानतळाला तीव्र विरोध करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली असून, यापुढे पाहणी करण्यासही विरोध केला जाईल. (वार्ताहर)
>मोजणीला विरोध
विमानतळ झाल्यास राजेवाडी-वाघापूर परिसर भकास होऊन तालुक्यातील पुढाऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी असल्याने त्यांच्या जमिनीला बाजार येणार आहे. आमच्या झोपा उडवणाऱ्यांना आम्ही झोप येऊन देणार नसल्याचे राजेवाडीतील महिलांनी सांगितले. मोजणीलाही विरोध करण्यात येईल.