उर्मट वाहनचालकांवर भर रस्त्यात कारवाई नको!
By admin | Published: January 20, 2016 02:35 AM2016-01-20T02:35:15+5:302016-01-20T02:35:15+5:30
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त आणि उर्मट वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात.
मुंबई: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त आणि उर्मट वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करताना अनेकदा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. हे टाळण्यासाठी आता आगळी शक्कल लढविली जाणार आहे. घटनास्थळावर त्यांच्यावर कारवाई न करता, केवळ त्यांची माहिती घेऊन सोडले जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अशा लोकांवर पोलीस ठाण्यात बोलावून कारवाई करावी, अशी सूचना पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केली आहे.
राज्य पोलीस दलातील सर्व घटकप्रमुखांनी त्या बाबत कर्मचाऱ्यांकडून त्यांची अंमलबजावणी करून घ्यावयाची आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वर्दळीच्या ठिकाणी वारंवार वाहनधारकांची पोलिसांबरोबर होत असलेल्या वादावादीचे प्रकार बंद होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्यावर त्याला अडविणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांकडून सर्रासपणे त्याच ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाते, अशा वेळी वाहनचालक वाद घालत राहिल्याने त्यांच्याजवळ अन्य नागरिकही जमा होतात. त्यामुळे थोड्या वेळात परिसरात मोठी गर्दी होऊन बिकट परिस्थिती निर्माण होते. कधी-कधी त्याचे पर्यवसान जमावाकडून पोलिसांना शिवीगाळ, मारामारी होईपर्यंत जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी हुज्जत घालणाऱ्या संबंधित वाहनचालकावर तातडीने कारवाई न करता, त्यांचे नाव, गाडीचा नंबर, मॉडेल, मोबाइल नंबर आदीबाबतची माहिती नोंदवून घेत त्यांना तेथून जाऊ द्यावे. या प्रकारे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हाप्रमुखांनी पोलिसांनी या सूचनेची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आदेश महासंचालक दीक्षित यांनी अधिकाऱ्यांना बजाविले आहे. (प्रतिनिधी)