मराठा समाजाच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, धनंजय मुंडे यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:49 AM2018-07-19T03:49:03+5:302018-07-19T03:53:06+5:30
मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे.
नागपूर : मराठा समाजाने इतकी वर्षे संयम दाखवला आहे. लाखोंच्या संख्येचे मूक मोर्चे काढून जगासमोर आदर्श घालून दिला आहे. मराठा समाजातील तरुणांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, त्यांचा अंत बघू नका. या तरुणांनी वेगळी वाट चोखाळली तर त्यांना दोष देऊ नका, असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी सरकारला दिला.
धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत नियम २८९ अन्वये मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव मांडताना सरकारकडून मराठा समाजाची कशी फसवणूक होत आहे, याची माहिती दिली. मराठा समाजाने राज्यात आतापर्यंत लाखोंच्या संख्येने ५७ मोर्चे काढलेले आहेत. बुधवारी परळी येथे मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. २३ जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी आंदोलन होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
राज्यात मोर्चे काढूनही आरक्षण मिळत नसल्याने आता हे मोर्चे तालुका स्तरावर निघत आहेत. मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चे निघत आहेत. समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका , मराठा आरक्षण निर्णय तातडीने घ्या अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसचे सुनील दत्त म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाच्या नेत्यांनी सबका साथ, सबका विकास असे आश्वासन दिले होते. पण सरकार थापेबाज आहे. मराठा समाजाचा सरकारने अंत पाहू नये. भाई जगताप यांनीही सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक होत असल्याचा आरोप केला. नरेंद्र पाटील यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली. विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत, आरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची भूमिका मांडली. आरक्षणाचा विषय न्यायालयात असल्याने सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कुठे आरक्षण दिले, असा सवाल केला. यावर विरोधक अधिक आक्रमक झाले. गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब केले. कामकाजाला सुरुवात होताच सुनील तटकरे म्हणाले, चार वर्षात सरकारने खोटेपणाचा कळस गाठला आहे. तावडे यांनी सरकारची भूमिका मांडताना केलेले आक्षेपार्ह वक्तव्य रेकॉर्डवरून काढण्याची सूचना केली. तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन सभापतींनी दिले.