‘कर्ज फेडासाठी किडनी घेता की जी!’;महिला शेतकऱ्याची आर्त विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:31 AM2018-08-02T01:31:36+5:302018-08-02T01:31:59+5:30
‘अर्धा एकर शेती. त्यात दीड क्विंटल धान पिकले. घरचा माणूस आजारी. पोरीच्या लग्नाचे ८० हजार कर्ज. मायक्रो फायनान्सवाले जगू देत नाही. मी लोकांच्या घरी स्वयंपाक करून घर चालविते.
- ज्ञानेश्वर मुंदे
भंडारा : ‘अर्धा एकर शेती. त्यात दीड क्विंटल धान पिकले. घरचा माणूस आजारी. पोरीच्या लग्नाचे ८० हजार कर्ज. मायक्रो फायनान्सवाले जगू देत नाही. मी लोकांच्या घरी स्वयंपाक करून घर चालविते. साहेब, आता कर्ज फेडासाठी मले किडनी विकाची आहे. कोणी घेता का जी?’डोळ्यात पाणी आणून एक महिला शेतकरी अशी आपली चित्तरकथा सांगत होती.
भंडारा जिल्ह्यातील सालेबर्डी येथील मालाबाईकडे (नाव बदललेले) अर्धा एकर शेती आहे. पती, तीन मुली आणि एक मुलगा असा संसार. चार वर्षापूर्वी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी एक एकरातील अर्धा एकर शेती विकली. चार महिन्यांपूर्वी मधल्या मुलीचे लग्न केले. त्यासाठी मायक्रो फायनान्सकडून ४५ हजाराचे आणि बहिणीच्या नावावर बचत गटाकडून ३० हजारांते कर्ज घेतले. शेती पिकेल, कर्ज फेडू अशी आशा होती. परंतु अर्धा एकर शेतीत हाती आले केवळ दीड क्विंटल धान.
नवरा हृदयविकाराने सतत आजारी असतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा गाडा मालाबाईलाच चालवावा लागतो. लहान मुलगी बारावीत तर मुलगा दहावीत शिकत आहे. अशा परिस्थितीत मालाबाई रोज भंडारा येथे दहा किलोमीटर सायकलने येऊन एका घरी स्वयंपाक करते. त्यातून मिळणाºया पैशावर कुटुंब चालविते.
आता कर्जदार तिच्यामागे पैशाचा तगादा लावत आहेत. हे सर्व पैसे कसे फेडावे याचीच तिला चिंता आहे. ही विवंचना तिने सर्वांना वारंवार सांगून बघितली. परंतु उपयोग झाला नाही.
- शेतकºयाने आत्महत्या केल्यानंतर सरकार मदत करते, जिवंतपणी मदत करणार नाही का जी? असा मनाला सुन्न करणारा सवाल करून मालाबाईने समस्त धान उत्पादकांचे दु:खच मांडले.