अकरावी प्रवेशाचे टेन्शन घेऊन नका, विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालकांचे आवाहन
By admin | Published: July 15, 2016 08:25 PM2016-07-15T20:25:05+5:302016-07-15T20:25:05+5:30
अकरावासाठी अर्ज केलेल्या शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, अशी माहिती मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - अकरावासाठी अर्ज केलेल्या शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, अशी माहिती मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चर्नीरोड येथील शिक्षण
उपसंचालक कार्यालयाबाहेर पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. त्यांना आवाहन करत १८ जुलै रोजी जाहीर होणाऱ्या चौथ्या यादीची प्रतीक्षा पाहण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. तिसऱ्या यादीनंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेली विद्यार्थी गेल्या २ दिवसांपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर गर्दी करत आहेत. त्यांना माहिती देण्यासाठी उपसंचालक यांनी थेट संगणक कक्षामध्ये ठाण मांडले होते. गाऱ्हाणे घेऊन येणाऱ्या पालकांमधील बहुतेकांनी प्रवेश अर्ज किंवा पसंतीक्रम अर्ज भरण्यात चूक केली होती. त्यामुळे ते आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सामील होऊ शकले नव्हते. याशिवाय काही पालक असे होते, ज्यांच्या पाल्यांना तीन्ही गुणवत्ता यादीनंतरही कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही.
तिन्ही गुणवत्ता यादीनंतर प्रवेश मिळाला नसला, तरी पालकांनी चौथ्या यादीची प्रतिक्षा करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. शिवाय ज्या पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी चूकीचा अर्ज भरला आहे, त्यांना आणखी एकदा अर्ज भरण्याची संधी देण्याबाबत लवकरच कायदेशीर निर्णय घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे निश्चिंत होत पालकांनी कार्यालायकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. शिवाय योग्य अर्ज भरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, याची खात्रीही त्यांनी दिली आहे.
......................
आॅफलाईन प्रवेशाला भुलू नका
अनेक पालकांना महाविद्यालयांकडून आॅफलाईन प्रवेशाचे अमीष दाखवले जात आहे. मात्र अशा प्रवेशांना भुलू नका, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे. कारण संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही महाविद्यालयाने आॅफलाईन प्रवेश केल्यास, त्याची माहिती उपसंचालक कार्यालयाला मिळणार आहे. परिणामी आॅफलाईन प्रवेश रद्द करत दोषी महाविद्यालयांविरोधात कारवाई केली जाईल. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांचे नाहक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थी किंवा पालकांनी आॅफलाईन प्रवेश घेऊ नये, याउलट अशा पद्धतीचे प्रवेश दिसल्यास, त्याची तक्रार करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
.........................
अकरावीच्या १ लाख जागा रिक्त राहणार
अकरावी प्रवेशासाठी यंदा आॅनलाईनच्या माध्यमातून १ लाख ५० हजार २३४ जागा आणि आॅनलाईन कोट्यातून १ लाख १९ हजार ५३८ जागा भरण्यात येणार होत्या. अशाप्रकारे एकूण २ लाख ६९ हजार ७७२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. या
जागांसाठी यावर्षी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यामुळे यंदा सुमारे ४७ हजार जागा रिक्त राहणार, हे निश्चित होते. मात्र सलग तीन गुणवत्ता यादीनंतर एकूण १ लाख १६ हजार ५१४ विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश देण्यात आला आहे. तर कोट्यातून सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे उरलेल्या १ हजार २५८ विद्यार्थ्यांना चौथ्या यादीनंतर प्रवेळ मिळाला, तरी एकूण प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ५२ हजारांच्या घरात जाईल. म्हणजेच सुमारे १ लाख १७ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...................
चौथ्या यादीनंतरही विद्यार्थी शिल्लक राहणार
अकरावी आॅनलाईनची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर १ हजार २५८ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले होते. त्यांच्यासाठी १८ जुलैला अकरावीची चौथी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. मात्र चौथ्या यादीतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतलेले आहेत. शिवाय सुमारे हजार विद्यार्थ्यांमधील केवळ ३०० ते ३५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, तर सुमारे ७०० विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत असतील, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे चौथ्या यादीनंतर शिल्लक राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासन काय शक्कल लढवणार हे २१ जुलैनंतरच स्पष्ट होईल.