मुख्यमंत्रीपदाबाबत बोलू नका; फडणवीस-ठाकरेंच्या सूचना, युती घट्ट असल्याचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:41 AM2019-06-25T04:41:36+5:302019-06-25T04:42:04+5:30
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या.
मुंबई : भाजप-शिवसेना युतीबाबत सगळे ठरलेले आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या. विधानभवनात ही बैठक झाली. यावेळी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांचा सत्कार करण्यात आला.
आम्ही एक आहोत आणि युती घट्ट असून विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणेच सामोरे जाऊ, अशी ग्वाही फडणवीस आणि ठाकरे यांनी दिली. ठाकरे म्हणाले की, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मी व मुख्यमंत्री यांचे युतीबाबत सगळे ठरले आहे. कुणाला काहीही बोलू द्या, युती पक्की आहे. दोन्ही पक्षांचे नेते-कार्यकर्ते लोकसभा निवडणूक एकदिलाने लढले तीच एकी विधानसभा निवडणुकीतही दाखवायची आहे, दोघांनीही सांगितले.
भाजपच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री पदावर भाजपचाच दावा असल्याचे सूचित केले होते. शिवसेनेचे संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री पदाबाबत काही विधाने केली होती. तथापि, फडणवीस आणि ठाकरे यांनी आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत बोलण्याची गरज नसल्याची तंबीच एकप्रकारे दिली.
‘बेसावध राहू नका’
मुख्यमंत्री म्हणाले की, दोन्ही पक्षांचे मनोमील सर्वांनी लोकसभा निवडणूक प्रचारात अनुभवले. त्याचा मोठा फायदाही झाला. चालू अधिवेशनातही आम्ही एकत्रित आहोत. विरोधक फारच नाऊमेद आहेत पण बेसावध राहू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.