शिवरायांच्या महाराष्ट्राला सहिष्णुता शिकवू नका - उद्धव ठाकरे
By admin | Published: October 22, 2015 08:52 AM2015-10-22T08:52:26+5:302015-10-22T09:07:38+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वासाठी देशाच्या दुश्मनांशी दोन हात करणारे शिवसेनाप्रमुख यांच्या महाराष्ट्राला कोणीही सहिष्णुता शिकवू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना लगावला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे निरपराध्यांच्या रक्ताने या देशाची माती लालेलाल होत असतानाही सहिष्णुतेची जपमाळ ओढत बसायचे, ही नामर्दानगी शिवसेनेच्या रक्तात नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वासाठी देशाच्या दुश्मनांशी दोन हात करणारे शिवसेनाप्रमुख यांच्या महाराष्ट्राला कोणीही सहिष्णुता शिकवू नये असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
पाकिस्तानच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून आक्रमक बनलेल्या शिवसेनेवर चहूबाजूंनी टीका होत असून दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनीही शिवसेनेला इशारा देत चर्चा व वादविवादाच्या ‘सभ्य मार्गा’ने विरोध व्यक्त करण्याचा सल्ला दिला होता.
त्या पार्श्वभूमीवर 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. हिंदुस्थानचे लचके तोडण्यास येणार्यांशी आम्ही काय ‘सहिष्णू’तेचे पत्ते पिसत बसायचे का असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दुश्मनांना क्षमा करणार नसल्याचे बजावत राष्ट्रहिताशी आम्ही कधीच तडजोड करणार नाही असे सांगत उद्धव यांनी शिवसेनेच्या पाकविरोधी भूमिकेचे समर्थनच केले.
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- शिवसेनेने आपली शस्त्रे कधीच झाडावर ठेवली नाहीत व गंजू दिली नाहीत. हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की त्याने सत्तेसाठी कधीही जनतेशी प्रतारणा केलेली नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान व राष्ट्राची सुरक्षा याबाबतीत शिवसेनेने दळभद्री तडजोडी केल्या नाहीत. शिवसेना हे प्रखर हिंदुत्वाचे एक ज्वलंत मिशन आहे. पण आज जो उठतोय तो ‘सहिष्णुते’ची सेक्युलर बांग देत राष्ट्राभिमान्यांना आलतूफालतू सल्ले देत आहे. ज्या राष्ट्रवादाचा आणि हिंदुत्वाचा उगम महाराष्ट्राच्या भूमीतून झाला, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!’ हा राष्ट्रीय मंत्र ज्या लोकमान्यांनी देशाला दिला, पहिल्या व एकमेव हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या शिवरायांनी केली, अखंड हिंदू राष्ट्राची क्रांतिकारी गर्जना ज्या वीर सावरकरांनी केली आणि हिंदुत्वासाठी ज्यांनी देशाच्या दुश्मनांशी दोन हात केले त्या शिवसेनाप्रमुखांच्या महाराष्ट्राने हिमालयाच्या रक्षणासाठी सदैव छातीचा कोट केला आहे. हे आज आम्हाला राष्ट्रीयत्वाचे व सहिष्णुतेचे सल्ले देणार्यांनी समजून घेतले पाहिजे.
- राज्यात व देशात सत्ताबदल नक्कीच झाला आहे. पण देशाचे व जनतेचे स्वप्न साकार झाले काय? गोमातेवरून हिंसाचार व आंदोलने सुरू आहेत. मुंबईत शाकाहारींनी लादलेल्या खाण्यापिण्याच्या अटी शिवसेनेने ‘लोकशाही’ मार्गाने मोडून काढल्या आहेत. आम्ही सहिष्णू आहोत म्हणूनच लोकशाही मार्गाने राडे केले व पाक एजंटांच्या तोंडास काळे फासून जगाला हिंदुस्थानच्या तीव्र भावना दाखवून दिल्या. गोमांस खाणार्यांनी पाकिस्तानात चालते होण्याचे ‘फर्मान’ देऊन भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सहिष्णुतेचे जे विराट दर्शन घडविले त्या भूमिकेत रस्त्यावरची राडेबाज शिवसेना अद्याप शिरलेली नाही. प्रश्न रस्त्यावर सोडविले जात नाहीत हा उपदेश बरा आहे. पण अयोध्येचे आंदोलन रस्त्यावर केले व अयोध्येतील रस्ते आणि शरयू नदीच नव्हे तर मुंबईतील रस्तेही त्यावेळी रक्ताने लाल झाले. म्हणूनच आज हिंदुत्ववाद्यांचे राज्य दिल्लीत व बर्याच ठिकाणी आले. गोध्राकांडानंतर गुजरातमध्ये जो राडा झाला त्या हिंदुत्वाच्या उद्रेकामुळे गुजरातचे भाजपराज अचल राहिले हे विसरता येईल काय?
- लोकशाहीत रस्त्यांवरील राड्यांना महत्त्व आहे. नाहीतर राजकीय पक्षांचा संघर्ष इतिहासजमा होईल. शिवसेना इतिहास घडवणारा पक्ष आहे व आमच्या वाटेत आडवे येणारे इतिहासजमा झाले हा आमचा इतिहास आहे. ‘बीफ’वरून जम्मू-कश्मीर व दिल्लीजवळ हिंसक राडेबाजी सुरू आहे. भाजपप्रणीत कश्मीरात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे जरा जास्तच बुलंद झाले आहेत. आगलाव्या ‘इसिस’चे झेंडेही राजरोस फडकावून हिंदूंना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहायचे, थंड डोक्याने सहन करायचे व आपल्या स्वाभिमानी माना पाकिस्तानी कसायांपुढे वाकवायच्या यालाच जर कुणी सहिष्णुता म्हणत असेल तर या फालतू सहिष्णुतेमुळे देशात अधर्म व अराजकाचे राज्य आल्याशिवाय राहणार नाही.
- शिवसेनेने पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम होऊ दिला नाही. पाकिस्तानचा माजी विदेशमंत्री कसुरी याच्यासाठी पायघड्या घालणार्यांचे तोंड काळे केले. पाकड्या क्रिकेटपटूंना आग्रहाचे, प्रेमाचे निमंत्रण देणार्या क्रिकेट बोर्डाच्या कार्यालयात घुसून धिक्कार केला. यामुळे देशाची सहिष्णुता वगैरे धोक्यात आली व राज्य किंवा देशाची बदनामी झाली असे कुणाला वाटत असले तरी आम्हाला या बोटचेप्या मतांची पर्वा करण्याचे कारण नाही. तोंडात एक व पोटात दुसरे हा आमचा धर्म नाही. पाठीत वार करण्याचे धंदे आमच्या रक्तात नाहीत व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करण्याचे तंत्र आम्ही कधीच मानले नाही. तेव्हा सत्तेचा गूळ दिसला म्हणून त्यावर चढून चिकटून बसण्याचे धोरण आम्ही मानलेले नाही. राष्ट्रहिताशी तडजोड नाही. महाराष्ट्र-अस्मितेच्या दुश्मनांना क्षमा नाही.
- महाराष्ट्रातील काँग्रेसची वतनदारी जनक्षोभाच्या सुरुंगाने उद्ध्वस्त करण्याची कामगिरी महाराष्ट्रात प्रथम शिवसेनाप्रमुखांनी करून दाखवली. त्या महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही सर्वप्रथम देणे लागतो. आम्ही निदान महाराष्ट्रात तरी पाकड्यांच्या विरोधात हिमतीने उभे राहिलो. पाकिस्तान विरुद्ध शिवसेना हा झगडा राजकीय मतलबाचा नसून देशाभिमानाचा आहे व यामुळे कुणी ‘युनो’त जाऊन शिवसेना ‘दहशतवादी’ असल्याची तक्रार करणार असेल तर त्या तक्रारींची ‘भेंडोळी’ औरंगजेबाच्या थडग्यावर जाळून राख करण्याची हिंमत शिवसेनेत आहे. दळभद्री पाकड्यांमुळे हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिनही सुरक्षित नाही व पंतप्रधान मोदींनाही बुलेटप्रूफ काचेआडून देशाला संदेश द्यावा लागतो. हे सहन करणे यालाच तुम्ही सहिष्णुता म्हणणार आहात काय?
- तिथे पाकड्यांनी आमचे जवान मारायचे, धमक्या द्यायच्या व आम्ही त्यांच्यासाठी येथे त्याच रक्तावर पायघड्या पसरवायच्या. हे रोखण्यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यात सत्ताधार्यांनी सहभागी व्हायला हवे होते, पण सत्तेमुळे मती बिघडते व ‘शंभर बारामती’ होते. अर्थात म्हणून शिवसेना घेतलेला वसा सोडणार नाही! सत्ता बदलली, पण चिंतेचे विषय बदलले नाहीत. कश्मीरात मुफ्ती मोहम्मद सईदला पाठिंबा देण्याने सहिष्णुता मजबूत होते व मुंबईत पाकिस्तानच्या माजी मंत्र्याला ‘सरकारी’ संरक्षण देण्याची सहिष्णुता चार चांद लावून जाते. या सगळ्यात देशाचा व जनभावनांचा खेळखंडोबा होऊ नये.