भगवानगडावर ‘हक्क’ सांगू नये
By Admin | Published: September 30, 2016 02:15 AM2016-09-30T02:15:32+5:302016-09-30T02:15:32+5:30
भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची
अहमदनगर : भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कुणीही भगवानगडासारख्या धार्मिक स्थळांवर राजकीय वारसा हक्क सांगू नये. हा गड भाविकांचा होता तो भाविकांचाच राहू द्या, असे आवाहन गडाचे महंत ह.भ. प. डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
‘भगवान गड कुणाचा?’ असे भाष्य आज ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. यासंदर्भात नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला गडाच्या ट्रस्टींनी विरोध केल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र, यात काहीही राजकारण नाही अथवा कुणीही नेता यापाठीमागे नाही. पंकजा मुंडे यांनी गतवर्षी गोपीनाथ गड काढला. त्या गडाच्या उद्घाटन समारंभातच ‘भगवानगड हा यापुढे केवळ भक्तीचा गड राहील तर राजकारण गोपीनाथ गडावरुन चालेल’, असे आपण जाहीर केले होते. त्यानंतर जानेवारीत भगवानगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमातही ‘भगवानगडावर यापुढे किर्तनकारांशिवाय कुणीही बोलणार नाही’,हे स्पष्ट केले आहे. सर्व समाजाने त्यावेळी या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. पंकजा यांनी दसऱ्याला गडावर जरुर यावे. मात्र त्यांना येथे भाषण करता येणार नाही, एवढेच आमचे म्हणणे आहे. भगवानबाबांची ही गादी सर्वांनी जपावी. पंकजा यांना भाषण करावयाचेच असेल तर ते गडाच्या पायथ्याशी करावे. त्यांना आमचा पाठिंबा राहील. भाषणासाठी हट्ट करुन कुणीही आपल्या नेत्याला लहान करु नये. मराठा समाजाने काहीही न बोलता मूकमोर्चे काढत एकजूट दाखवली. त्यामुळे भाषणावरुन समाजात भांडणे नकोत, असे शास्त्री म्हणाले. ( प्रतिनिधी)