गोव्याची महती सांगू नका
By admin | Published: October 13, 2014 09:46 PM2014-10-13T21:46:30+5:302014-10-13T23:07:01+5:30
नारायण राणे : कणकवलीतील प्रचारसभेत मोदींवर टीका
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध असून गोवा राज्याला या जिल्ह्यातूनच तिलारी धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गोव्याची महती सांगू नये. येथील विकास नियोजनबद्धरित्या सुरु असून गोव्यासारखा विकास आम्हाला नको आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते व प्रचार समितीप्रमुख नारायण राणे यांनी केले.
कणकवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारासाठी येथील हॉटेल सह्याद्रीसमोर सोमवारी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबा वर्देकर, भाई खोत, नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, प्रणिता पाताडे, संदीप कदम, डॉ. मिलिंद कुलकर्णी, मधुसूदन बांदिवडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, कासार्डे येथे पाहुण्यांची सभा होती. पाहुणे आले आणि गेले. मात्र, आम्ही येथेच राहणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताला गोव्याहून माणसे आणण्यात आली होती. गोव्यात मद्य स्वस्त आहे. त्यामुळे तेथे अनेक माणसे धुंदीत असतात. तशाप्रकारचा विकास आम्हाला नको आहे. नरेंद्र मोदी यांनी येथील विकासाबाबत आधी माहिती घ्यावी आणि त्यानंतरच टीका करावी. ‘अच्छे दिन’ कधी येणार हे त्यांनी सांगावे. पालघर येथील प्रचारसभेत अच्छे दिन येण्यासाठी २०२२ पर्यंतचा वेळ आम्हाला द्या असे मोदींनी सांगितले. मात्र तेवढा वेळ आम्ही देणार नाही. नरेंद्र मोदी हे बनवाबनवी करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसला येथील जनतेचा पाठिंबा असून विधानसभा निवडणुकीत निश्चितच नीतेश राणे विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नीतेश राणे म्हणाले, कणकवली तालुक्याशी माझे कौटुंबिक तसेच भावनिक नाते जुळलेले आहे. कुटुंबप्रमुख आपल्या घरातील सर्व व्यक्ती कशा सुखी होतील हे पहात असतो. त्याप्रमाणेच या तालुक्यातील लोकांबद्दल मला प्रेम आहे.
येथील जनतेचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळत आहे हे माझे मी भाग्य समजतो. यापुढे माझ्यावर पडणाऱ्या जबाबदारीची मला जाणीव असून तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे. २००९ पासून कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विकास थांबला आहे. शिवसेना, भाजपचे नेते काय बोलतात हे त्यांचेच त्यांना समजत नाही. त्यांना जनतेबाबत कोणतीही आस्था नाही. येत्या पाच वर्षात येथील विकास केला नाही तर २०१९ मध्ये पुन्हा तुमच्यासमोर मतांसाठी येणार नाही. या निवडणुकीत मला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. भालचंद्र मुणगेकर, बाबा वर्देकर आदींनीही मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)