त्यांना काश्मिरातील असहिष्णुता दिसत नाही काय?
By admin | Published: December 5, 2015 09:07 AM2015-12-05T09:07:10+5:302015-12-05T09:07:11+5:30
इंद्रेशकुमारजी यांचा सवाल : तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेचा समारोप
कोल्हापूर : काश्मीरमध्ये टोकाचा भारतद्वेष केला जातो, राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, ही असहिष्णुता विचारवंत आणि कलाकारांना दिसत नाही काय? असा परखड सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमारजी यांनी शुक्रवारी येथे केला.ब्राह्मण सभा करवीर व महालक्ष्मी बँकेतर्फे प्रायव्हेट हायस्कूल सभागृहात आयोजित तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमालेत ‘काश्मीर-समस्या आणि समाधान’ या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप झाला.
इंद्रेशकुमारजी म्हणाले, जगातील सर्वांत मोठे संविधान असणारे भारत हे एकमेव राष्ट्र आहे, तसेच तात्पुरत्या स्वरुपातील ‘३७० कलम’ लागू असणारेही एकमेव राष्ट्र आहे. हे कलम तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लागू केले. या कलमाने काश्मीरमध्ये भारतीय कायदा व संसदेचा कोणताही निर्णय लागू होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान झाला तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई भारत सरकारला करता येत नाही. भारतीय संविधानातील अनेक कायदे अजूनही तेथे लागू होत नसल्याने आपल्याला उघड्या डोळ्यांनी भारतमातेचा व राष्ट्रध्वजाचा अवमान बघावा लागत आहे. याला काय सहिष्णुता म्हणायची काय? ही असहिष्णुता देशातील विचारवंत आणि कलाकारांना का दिसत नाही?ते म्हणाले, ‘३७० कलमा’मुळे आपण आतापर्यंत काय कमावले आणि गमावले? या विषयावर चर्चा करायला देशातील धर्मनिरपेक्ष नेते व कम्युनिस्ट नेते तयार नाहीत. संविधानाची पायमल्ली करून देशाचे तुकडे करायला लावणाऱ्या या कलमाचा कर्करोगासोबत घेऊन आपण आतापर्यंत का राहत आहोत, हा प्रश्न आहे. १५ आॅगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मालक जर महात्मा गांधी आणि पंडित नेहरू असतील, तर त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या भारत-पाक विभाजनाचे मालकही तेच आहेत. करोडो लोकांच्या बलिदानानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आताही काश्मीरच्या सीमेवर जवान देशासाठी बलिदान देत आहेत. जो देश बलिदान समजून घेत नाही, तो देश भटकत राहतो. या सत्याला देशाने जाणले पाहिजे. भारताने पाकिस्तान आणि चीनविरोधात अनेक युद्धे करून ती जिंकली. आता या युद्धाऐवजी दहशतवादाचा अवलंब होत आहे. या युद्धासाठी होणाऱ्या खर्चाच्या दहापट खर्च हा दहशतवादासाठी होतोय, ही सद्य:स्थिती आहे.
यावेळी महालक्ष्मी बँकेचे
अध्यक्ष विनोद डिग्रजकर, ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, भालचंद्र अष्टेकर, हरिश्चंद्र अष्टेकर, महेश धर्माधिकारी, संदीप कुलकर्णी, सुहास तेंडुलकर, अॅड. राजेंद्र किंकर, नंदकुमार मराठे, श्रीकांत लिमये आदी उपस्थित होते. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)