पेणमध्ये चार कुटुंबांना टाकले वाळीत
By admin | Published: August 9, 2015 02:15 AM2015-08-09T02:15:13+5:302015-08-09T02:15:13+5:30
एका गुन्ह्यात आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून पेण शहरातील खान मोहोल्ला परिसरात राहाणाऱ्या चार मुस्लिम कुटुंबांना, तिघा मुस्लिम व्यक्तींनी वाळीत टाकून समाजातून
अलिबाग : एका गुन्ह्यात आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून पेण शहरातील खान मोहोल्ला परिसरात राहाणाऱ्या चार मुस्लिम कुटुंबांना, तिघा मुस्लिम व्यक्तींनी वाळीत टाकून समाजातून बहिष्कृत केल्या प्रकरणी पेण पोलिसांनी शुक्रवारी त्या तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी व आरोपी हे दोघेही मुस्लिम सुन्नी या एकाच धर्माचे आहेत २००९ पासून आजपर्यंत हे सर्वजण पेण मधील खान मोहल्ला येथेच राहणारे आहेत. वाळीत टाकण्यात आलेली तीन कुटुंबे मुस्लीम सुन्नी तबलिग या पंथाचे असून आरोपी व इतर ग्रामस्थ हे मुस्लीम सुन्नी बेरेलवी या पंथाचे आहेत. आरोपी नं. १ हा खान मोहल्ला प्रार्थनास्थळाचा विश्वस्त आहे. त्याचा फायदा घेवून त्यांनी व आरोपी नं २ व ३ यांनी आपसात कट रचून, खान मोहल्ल्यातील मुस्लीम समाजातील लोकांना चिथावणी देवून २००८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी त्यांच्या विरोधात साक्ष दिली.
पत्र्याचे बोर्ड व स्टीकर लावून समाजातून बहिष्कृत
फिर्यादी व इतर ३ कुटुंबिय सुन्नी तबलीग पंथाचे असल्याने त्यांना प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश नाकारुन त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करु नये अशा आशयाचे पत्र्याचे बोर्ड व स्टीकर लावून फिर्यादी व इतर ३ कुटुंबियांना समाजातून बहि़ष्कृत केले. फिर्यादी वाटेत भेटल्यानंतर नेहमी शिवीगाळी व मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.