पोलिसांना तुमचे घरगडी समजू नका
By admin | Published: November 2, 2015 02:55 AM2015-11-02T02:55:44+5:302015-11-02T02:55:44+5:30
पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्याच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे
मुंबई : पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्याच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. उपायुक्त व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी कार्यालय व निवासस्थानी ड्युटीवर असलेले पोलीस तुमचे घरगडी नाहीत, त्यांना सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमच त्यांनी भरला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या तुच्छ वागणुकीबाबत पोलीस महासंचालकांकडे अनेक कर्मचाऱ्यांनी निनावी तक्रारी केल्या आहेत. कार्यालयीन कामा व्यतिरिक्त अधिकारी, त्यांची पत्नी व कुटुंबीयांकडून सर्रास अन्य कामे करण्यास सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर महासंचालक दीक्षित यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षक व अन्य घटकप्रमुखांसाठी एक परिपत्रकच जारी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास आयुक्त/अधीक्षकांनी तातडीने त्या दरबार घेऊन सोडवाव्यात. या तक्रारींचे निवारण न झाल्यास कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस उपायुक्त / अधीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी एक मदतनीस (आॅर्डली), आॅपरेटर, तसेच निवासस्थानी दोन शिफ्टमध्ये प्रत्येक एक कर्मचारी दिला जातो. काही वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पोस्टिंगवर असलेले अधिकारी घरी काम करण्यासाठी ३-४ कर्मचाऱ्यांना ड्युटी लावतात. जिल्ह्याच्या ठिकाणी काही प्रभारी अधिकारी त्यांना अधिकार नसतानाही गैरप्रकारे घरातील कामासाठी कर्मचारी ठेवत असल्याचे उघड झाले आहे.
नाशिकमधून जास्त तक्रारी : अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत सर्वाधिक तक्रारी नाशिक आयुक्तालयांतर्गंत आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना अत्यंत तुच्छतेची वागणूक देण्याबरोबरच वैयक्तिक कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचे महासंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.