होळीला रासायनिक रंगाचा वापर करु नका - रामदेव बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:30 PM2018-03-01T14:30:15+5:302018-03-01T15:27:01+5:30
सध्याची सण साजरा करण्याची पध्दत चुकीची असून ती आपली संस्कृती नाही.
वाशिम : होळीच्या सणाला रासायनिक रंगांचा वापर करु नका. रासायनिक रंगांनी विविध त्वचेचे आजार उदभवतात. होळीच्या दिवशी व्यसनांना तिलांजली दया. नशेत धुंद होऊन होळी साजरी करणे, ही आपली संस्कृती नाही, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी येथे केले. योग शिबिरास्थळी रामदेव बाबांनी नागरिकांसोबत फुले उधळून होळीचा सण साजरा केला.
येथील दिघे फार्मजवळच्या योगभूमीवर सुरू असलेल्या नि:शुल्क योग शिबिराच्या शेवटच्या दिवशी आयोजित शिबिरात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला व्यसनमुक्त होण्याचा सल्ला देतानाच स्वामी रामदेवबाबा यांनी योगासनांचे धडेही दिले. सध्याची सण साजरा करण्याची पध्दत चुकीची असून ती आपली संस्कृती नाही. प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, आचार-विचार उच्च प्रतीचे करण्यासाठी योग, प्राणायाम करणे जरूरी आहे. जीवनात कुठलेही व्यसन करू नका. सत्य बोला, आचार-विचार शुध्द ठेवा, गोरगरीबांना मदत करा, असे आवाहनही स्वामी रामदेवबाबा यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी बाबा रामदेव यांनी नागरिकांसोबत होळी खेळल्याने सर्वत्र उत्साह संचारला होता.