भाषेचा वापर राजकारणासाठी करू नका- अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:53 AM2018-10-30T02:53:05+5:302018-10-30T06:35:53+5:30

साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला.

Do not use language for politics - Aruna Dheer | भाषेचा वापर राजकारणासाठी करू नका- अरुणा ढेरे

भाषेचा वापर राजकारणासाठी करू नका- अरुणा ढेरे

Next

पुणे : सर्वांचा सांस्कृतिक भूगोल सारखाच आहे. बेळगाव आपलेच आहे. ते आपले नव्हते, असे कधीच झालेले नाही. राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीचा संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज आहे. भौगोलिकदृष्ट्या सोयीसाठी राज्यांची रचना झाली. मात्र, आपण सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले असू, तर माणसांनी सीमारेषा पुसून टाकायला हवी.

आजकाल प्रत्येक गोष्टीत राजकारण आणले जाते. राजकारणाशिवाय विचार करणे फार कमी लोकांना जमते. भाषा ही राजकारणासाठी वापरू नका. साहित्यिकांनी दर्जेदार साहित्याची निर्मिती करून राजकारणापेक्षा साहित्यकारणाचा विचार करणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, असा मौलिक सल्ला नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी दिला.

यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे यांची सन्मानाने निवड केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अध्यक्षपदाची निवड माझ्यासाठी केवळ वर्षभरापुरता उपचार नाही. वाड्मयीन परंपरेतील सर्व गढूळपणा निघून जाऊन ती निखळपणे पुढे नेण्याची माझी इच्छा आहे. घरातून मिळालेले साहित्याचे संस्कार घेऊन आयुष्यभर ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करणार आहे, अशा शब्दांत ढेरे यांनी भावना व्यक्त केल्या. मराठी भाषा मुळातच अभिजात आहे. त्याबाबतचे अनेक प्राचीन पुरावे केंद्र शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यावर केवळ केंद्राची मोहोर बाकी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवस्मारकाबाबत भूमिका काय, असे विचारले असता, डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘पुतळे, स्मारके यांच्या पलीकडे जाऊन शिवाजीमहाराज समजून घेण्याची गरज आहे. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आज्ञापत्रांचे उत्तम संपादन केले. ज्यांचे आपण नुसते नाव घेतो, त्यांच्या कार्याची व्याप्ती, महाराष्ट्र आणि देशासाठी योगदान, कार्यकर्तृत्व इतिहासातून समजून घेणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. शिवरायांचे स्मारक करा अथवा करु नका, जमिनीवर करा किंवा समुद्रात करा; शिवरायांचे स्मारक व्हायचेच असेल, तर ते सामान्य माणसाच्या मनात व्हावे.

ढेरे म्हणाल्या, ‘‘संमेलनाध्यक्षपदाची पुण्याई खूप मोठी आहे. ज्ञानवंत, विचारवंतांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे. अद्यापही मी स्वत:ला या पदासाठी योग्य समजत नाही. साहित्याची सेवा एका वर्षात होण्यासारखी नाही. ज्या ज्ञानपरंपरेमध्ये माझे वडील लिहीत होते, त्यामध्ये वाङ्मयबाह्य गोष्टींचा कधीच विचार झाला नाही. त्यांनी केवळ साहित्य, संस्कृतीची सेवा केली.

४सध्याचा जमाना मल्टिस्क्रीनचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिव्यक्तीचे माध्यम मिळाले आहे. नव्या माध्यमातून अनेक माणसे लिहू लागली. या माध्यमात दीर्घकालीन, टिकाऊ साहित्य निर्माण होऊ शकणार नाही. मात्र, तिथे माणसांना संवाद साधावासा वाटतो, अभिव्यक्तीच्या कल्पना मांडता येतात. त्यातूनच आपण लिहावे, अशी प्रेरणा मिळते. त्यामुळे समाजमाध्यमांवर पूर्णपणे फुली मारता येणार नाही. मात्र, गंभीर आणि टिकाऊ वाङ्मयाकडे जाण्यासाठी ही वाट मिळते आहे आणि ती स्वागतार्ह आहे.’’

स्त्री-पुरूषापेक्षा साहित्याचा उत्तम व सर्वश्रेष्ठ दर्जा हा संमेलनाध्यक्ष निवडीचा निकष असावा. मुळात संमेलनाध्यक्षाचा विचार करताना स्त्री-पुरुष असा मतभेद करू नये. कारण स्त्री-पुरुषांपेक्षाही संमेलनाध्यक्ष पद मोठे आहे. येत्या काळातही महिला लेखिका त्यांच्या लेखणीच्या बळावर संमेलनाध्यक्ष होत राहतील. नव्या बदलाने संमेलनाची वाट प्रशस्त होत जाईल. त्यातून समाजाची वाङ्मयीन दृष्टी विस्तारत राहील.
४आज अण्णा असते, तर त्यांनी संमेलनाध्यक्ष पद स्वीकारायचे का नाकारायचे, याचे स्वातंत्र्यही मला बहाल केले असते. कारण नेहमी चांगले काम करण्याला त्यांचे प्राधान्य होते. संमेलनाध्यक्ष पदापेक्षा मी एखादा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला, तर त्याचा त्यांना खूप आनंद वाटला असता. कारण लौकिक गोष्टीचे स्थान काय असते, हे मला केवळ अण्णांमुळेच कळत गेले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Do not use language for politics - Aruna Dheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.