‘उत्सवांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन नको’
By admin | Published: October 7, 2015 02:05 AM2015-10-07T02:05:34+5:302015-10-07T02:05:34+5:30
कायदा प्रत्येक धर्माला सारखाच लागू होतो, धार्मिक सणांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने माऊंट मेरीच्या जत्रेवेळी मुंबई
मुंबई : कायदा प्रत्येक धर्माला सारखाच लागू होतो, धार्मिक सणांच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने माऊंट मेरीच्या जत्रेवेळी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.
मदर मेरीच्या जन्मदिवसानिमित्त वांद्रे येथे आठवडाभर मोठी जत्रा भरवण्यात येते. शहर-उपनगरांतून अनेक लोक येथे येतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बेकायदेशीर रीतीने उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्समुळे वाहतूक आणि पादचारी कोंडी होत असल्याने वांद्रे येथील रहिवासी लिल्लीयन पेस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.
वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महापालिकेने आखलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारींवरून या वर्षी १८३ बेकायदेशीर स्टॉल्स हटवण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने खंडपीठाला दिली. ‘कायदा सर्व धर्मांना सारखाच लागू होतो. धार्मिक उत्सवांच्या नावाखाली कोणीही कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही आणि सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीर मंडप व स्टॉल्स उभारू शकत नाही. केवळ याच उत्सवाच्या (माउंट मेरी जत्रा) वेळी महापालिका बेकायदेशीर स्टॉल्स हटवण्यात यशस्वी झाली आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
पालिकेने दरवर्षी जत्रेच्या दोन महिने आधी यासंदर्भात धोरण आखून संकेतस्थळ आणि वॉर्डमध्ये प्रसिद्धी देणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘धोरणाला वर्तमानपत्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी द्या,’ असे म्हणत खंडपीठाने याचिका निकाली काढली.
तक्रार असल्यास...
धोरणाविषयी काही तक्रार असल्यास याचिकाकर्ते महापालिकेकडे हरकत नोंदवू शकतात, असे खंडपीठाने म्हटले.
तर संबंधित वॉर्डच्या साहाय्यक आयुक्तांना या ठिकाणी बेकायदेशीर स्टॉल्स उभारले जाणार नाहीत; तसेच जत्रा झाल्यावर या ठिकाणचा कचरा उचलण्यात येईल, याची काळजी घेण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.