शिक्षकी पेशा नको रे बाबा...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:08 AM2019-07-24T11:08:21+5:302019-07-24T11:14:31+5:30
डीएड अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करत होते.
पुणे : बारावीनंतर डी. एड्.अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून यंदा प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. परिणामी राज्यातील डी.एड्.अभ्यासक्रमाच्या तब्बल ३५ ते ४० हजार जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ‘शिक्षकी पेशा नको रे...’ असे म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक ,संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून बुधवारी (दि.२४) तिस-या प्रवेश फेरीतून प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यात अनुदानित व विना अनुदानित डीएड अभ्यासक्रमाच्या एकूण ५३ हजार जागा असून प्रवेशासाठी केवळ १० हजार ७२८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमते एवढेही अर्ज प्राप्त झाले नाहीत. परिणामी प्रवेश अर्ज करणा-या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार आहे. डीएड् अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी काही वर्षांपूर्वी सुमारे एक ते सव्वा लाख विद्यार्थी अर्ज करत होते. त्यातील ५० टक्के विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते.परंतु,आता विद्यार्थ्यांनीच डीएडकडे पाठ फिरवली.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षात डीएड अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटली. त्यातच शासनाकडून राबविल्या जाणा-या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याऐवजी काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशास पसंती देत आहेत. तिसऱ्या फेरीपर्यंत सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत, असे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
..........
राज्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून शिक्षण विभागातर्फे सुमारे २००५ पासून शिक्षकांची रिक्त पदे भरलीच गेली नाहीत. त्यातच सध्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र,अद्याप त्यातून एकाही नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. नोकरी नसल्यामुळे विद्यार्थी डीएडकडे पाठ फिरत आहेत.परिणामी डीएड महाविद्यालयांना टाळे लागत आहे.मागील वर्षापेक्षा यंदा प्रवेशाच्या दोन हजार जागा कमी झाल्या असून यंदा डीएडला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या १२ ते १५ हजारापर्यंत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
.....
डीएड प्रवेशाची तीन वर्षांची आकडेवारी
वर्ष महाविद्यालय प्रवेश झालेले
संख्या क्षमता प्रवेश
२०१६-१७ ९८९ ६२,७३३ २०,२०४
२०१७-१८ ९४९ ६०,२३३ १७,८७५
२०१८-१९ ८४७ ५५,६४४ १७,०९२