भ्रष्टाचार नको, पगारात भागवा
By admin | Published: August 25, 2015 03:19 AM2015-08-25T03:19:56+5:302015-08-25T03:19:56+5:30
‘जाओ! पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथ पे यह लिख दिया था !’ दिवार सिनेमातील अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या डायलॉगचा आधार घेत राज्य शासनातील अधिकाऱ्यांना
- यदु जोशी, मुंबई
‘जाओ! पहले उस आदमी का साईन लेके आओ, जिसने मेरे हाथ पे यह लिख दिया था !’ दिवार सिनेमातील अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या डायलॉगचा आधार घेत राज्य शासनातील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचे आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघाने केले आहे. ‘भ्रष्टाचार नको, पगारात भागवा’ असा सल्लाही देण्यात आला आहे.
एखादा अधिकारी अथवा कर्मचारी भ्रष्टाचारात अडकून तुरुंगात गेला तर सार्वजनिक जीवनात त्याच्या लेकराबाळांना ‘इसका बाप चोर हंै, भ्रष्ट हैं’, असे टोमणे सहन करावे लागतात. त्यामुळे भ्रष्टाचार करताना चारदा विचार करा, असे आवाहन महासंघाने केले आहे. शासकीय अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ‘पगारात भागवा’ असे अनोखे अभियान महासंघाने सुरू केले असून, ते आता जिल्ह्याजिल्ह्यात राबविले जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आयोजित सभांना कामाच्या वेळेतून जाण्याची मुभा राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली आहे. प्रत्येक सभेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मार्गदर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे.
जे अधिकारी-कर्मचारी भ्रष्टाचार करताना सापडतील त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा, चौकशीअंती दोषी अधिकारी- कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात करा, अशी मागणी
स्वत: महासंघानेच केली आहे. भ्रष्टाचार सिद्ध झालेल्यांना निर्दोष ठरविण्यासाठी महासंघाकडून कोणतीही निवेदने शासन-प्रशासनाकडे दिली जाणार नाहीत, असे महासंघाने स्पष्ट केले
आहे.
भ्रष्टाचारमुक्तीच्या टिप्स..
- वेतन कमी असल्याची तक्रार करू नका.
- मोहापासून स्वत:ला आवरा.
- जनतेबद्दल आत्मीयता बाळगा.
- वरिष्ठांइतकेच जनतेचे प्रशस्तीपत्र महत्त्वाचे माना.
- अधिकाऱ्यांनो, काचेच्या केबिनमधून बाहेर या. शेतीच्या बांधावर जाऊन दु:ख समजून घ्या.
- शासन-प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी स्वत:हून महासंघाकडे तक्रारी कराव्यात.
राज्य सेवेतील ८० टक्के अधिकारी हे प्रामाणिकपणे काम करतात. २० टक्के गडबड करतात. त्यातील पाच टक्के सुधारण्यापलिकडे असतात. उर्वरित १५ टक्क्यांचे प्रबोधन या अभियानाद्वारे केले जाईल.
- ग.दि.कुलथे, संस्थापक, राजपत्रित अधिकारी महासंघ.