तुझे तोंड पाहावेसे वाटत नाही...
By admin | Published: January 15, 2015 01:03 AM2015-01-15T01:03:45+5:302015-01-15T01:03:45+5:30
‘बडे आदमी के लडके का किडनॅप करनेवाला हूँ’, असे आपणास राजेश दवारे याने सांगितले होते. ही बेधडक साक्ष खुद्द राजेशच्या प्रेयसीने युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रधान
प्रेयसीला राजेशचा तिटकारा : न्यायालयात दिली बेधडक साक्ष
नागपूर : ‘बडे आदमी के लडके का किडनॅप करनेवाला हूँ’, असे आपणास राजेश दवारे याने सांगितले होते. ही बेधडक साक्ष खुद्द राजेशच्या प्रेयसीने युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात बुधवारी दिली.
अन् ती राजेशवर संतापली
बचाव पक्षाने उलटतपासणीत या तरुणीला आणखी काही विचारायचे आहे काय, असे राजेशला विचारले होते. त्याने आपल्या वकिलास एक-दोन मुद्दे सांगितले होते. आणखी काही जणांशी प्रेमसंबंध आणि याच कारणावरून वडिलाने वसतिगृहात ठेवण्याच्या संदर्भातील हे मुद्दे होते. साक्ष संपल्यानंतर साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून बाहेर पडताना ती आरोपी राजेशवर वाघिणीसारखी चवताळली. हातवारे करीत त्याला म्हणाली, ‘तू सुटणार नाहीस, तुला आणखी कडक शिक्षा होईल, मला तुझे तोंड पाहावेसे वाटत नाही’ हे दृश्य पाहून अख्खे न्यायालय अचंबित झाले होते.
शाळेपासूनची मैत्री
आपली सरतपासणी साक्ष देताना ही तरुणी म्हणाली, आमची शाळेपासूनची मैत्री होती. दहाव्या वर्गात आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. आरोपी राजेशनेच प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता. आपणही त्याला प्रतिसाद दिला होता. दहावीच्या परीक्षेनंतर तो आपल्या गावी गेला होता. त्यामुळे २०११ ते १२ पर्यंत त्याच्याशी संपर्क नव्हता. डिसेंबर २०१३ मध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नात राजेश आला होता. तेथे गाठभेट झाली. त्यानंतर पुन्हा प्रेमसंबंधाला सुरुवात झाली.
खिंडसी, नवेगाव सहल
न्यायालयात ही तरुणी आपली साक्ष देताना पुढे म्हणाली, आजपासून सहा-सात महिन्यापूर्वी मी, राजेश, संदीप कटरे, त्याची मैत्रीण, दर्शन आणि त्याची मैत्रीण, माझी आणखी एक मैत्रीण आणि तिच्या दोन बहिणी टाटा सुमोने रामटेक खिंडसी येथे सहलीसाठी गेलो होतो. त्यानंतर आम्ही नवेगाव बांध येथे गेलो होतो. सायंकाळच्या वेळी आम्ही सावरी येथील राजेशच्या आजीकडे गेलो होतो. आम्ही दोघे नेहमीच मोटरसायकलने फिरत होतो. एक दिवस आम्ही कोराडीमार्गे आदासा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. जातेवेळी राजेश एका नाल्यात उतरला होता.
‘तो’ वरकमाईबाबत बोलला होता
फेब्रुवारी २०१४ मध्ये डॉ. चांडक यांच्या डेन्टल क्लिनिकमध्ये काम मिळाल्याचे राजेशने सांगितले होते. ८ ते १० हजार पगार आणि ३०० ते ५०० रुपये वरकमाई मिळत असल्याचे त्याने सांगितले होते. पेशंटकडून आपणाला १००-२०० रुपये मिळतात, असे सांगितले होते. राजेश हा माझ्या अॅक्टिव्हामध्ये पेट्रोल भरून द्यायचा.
अन् बडा कामबाबत तो म्हणाला
१५ आॅगस्ट २०१४ रोजी मी आणि राजेश मोटरसायकलीने रामटेकला गेलो होतो. सायंकाळी आम्ही तेथील एका लॉजमध्ये मुक्काम केला. त्याच वेळी डॉ. चांडक मॅडम यांचा राजेशला फोन आला होता. परंतु त्याने फोनला प्रतिसाद दिला नव्हता. त्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले होते की, आपण डॉ. चांडक यांच्याकडील काम सोडले आहे. त्यामुळे फोन घ्यायचा नाही. डॉ. चांडक हे आपणाला ३००० रुपये तुटपुंजा पगार देत होते आणि भरपूर काम करून घेत होते. त्याने चांडक यांच्या नावाने भरपूर शिव्या दिल्या. ‘उसको तो मैं देख लूंगा और सबक सिखलाऊंगा, असे तो बरळत होता. त्याच वेळी राजेशने माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, तू नोकरीच सोडली आहेस, तर तू माझ्या नर्सिंग ट्रेनिंगच्या दोन लाखांचा खर्च कसा करशील? त्यावर तो म्हणाला, ‘ तू पैशाची काळजी करू नको. मी एक मोठे काम करणार आहे आणि त्यानंतर पैसाच पैसा कमावणार आहे.’ या पैशातून कार विकत विकत घेईल, एक बीअरबार सुरू करेल त्याच प्रमाणे घर बांधेल. तो श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत होता. मोठे काम कोणते याबाबत विचारले असता ‘मै बडे आदमी के लडके का किडनॅप करनेवाला हूँ’, असे तो म्हणाला होता. तो दारूच्या नशेत बरळत असावा, असा समज करून आपण त्याच्या म्हणण्याकडे लक्षच दिले नव्हते, असेही या तरुणीने सांगितले.
न्यायालयात पोलीस फोटोग्राफर शिरीष वऱ्हाडपांडे, पंच प्रवीण गणूवाह, अजय समर्थ यांची साक्ष झाली.न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्यावतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय, अॅड. जयश्री वासनिक यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)