कालव्याने नाही, पाणी टँकरने द्या
By admin | Published: April 29, 2016 12:42 AM2016-04-29T00:42:01+5:302016-04-29T00:42:01+5:30
दौंड-इंदापूर यांना कालव्याने पाणी देण्याच्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी पालिकेत घंटानाद आंदोलन केले.
पुणे : दौंड-इंदापूर यांना कालव्याने पाणी देण्याच्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी पालिकेत घंटानाद आंदोलन केले. या गावांना कालव्याने पाणी दिले, तर ते शेतीसाठी वापरले जाईल, त्याची चोरी होईल. त्यामुळे पाणी टँकरने पुरवावे, अशी मागणी करणारे निवेदन या वेळी महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे व अरविंद शिंदे यांनी सांगितले की, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत फक्त साडेपाच टीएमसी पाणीसाठा आहे. काटकसरीने पाणी वापरल्याने हा साठा शिल्लक राहिला आहे. १५ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल. त्यातील १.६ टीएमसी पाणी दौंड-इंदापूरला देण्याची मागणी होत आहे. तसे केल्यास पुणेकरांच्या पाण्यावर संक्रात येईल. तरीही माणुसकीच्या दृष्टीने त्यांना पाणी देण्यास काँग्रेसचा विरोध नाही; मात्र ते कालव्यातून दिले तर त्याचा गैरवापर होईल. त्यामुळेच ते टँकरने दिले जावे, अशी आमची मागणी आहे.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले. शहराध्यक्ष बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अभय छाजेड, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, सुनंदा गडाळे, संगीता गायकवाड, सुनंदा गलांडे, अश्विनी गायकवाड, सुधीर जानजोत तसेच सर्व नगरसेवक, विविध आघाड्यांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते. पक्षाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन या वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी उपस्थितांना दिले. (प्रतिनिधी)