जॅकेट-पँट-शर्टवर ‘योग’ नको !
By admin | Published: June 24, 2016 05:20 AM2016-06-24T05:20:16+5:302016-06-24T05:20:16+5:30
योगसाधना’ भारतीय संस्कृतीची ओळख आहे. ‘योग’ कधी, कुठे, कसा आणि कोणत्या पोशाखात करावा, याचेही काही नियम आहेत.
नागपूर : ‘योगसाधना’ भारतीय संस्कृतीची ओळख आहे. ‘योग’ कधी, कुठे, कसा आणि कोणत्या पोशाखात करावा, याचेही काही नियम आहेत. दोन दिवसांपूर्वी देशभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा झाला. राज्याच्या उपराजधानीतील यशवंत स्टेडियम येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सर्व नेतेमंडळींनी मंचावर योगा केला, परंतु हा योग करताना कोणी जॅकेट तर कुणी पँट-शर्ट अशा पोशाखात होते. एवढेच नव्हे तर, प्रत्येकाच्या गळ्यात भगवे दुपट्टे होते. निश्चित हे सर्व चित्र अस्वस्थ करणारे होते.
यशवंत स्टेडियम येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शहरातील योगाचार्य रामभाऊ खांडवे, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, आ. नागो गाणार व उपमहापौर सतीश होले यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाग घेतला होता. गडकरी व बावनकुळे यांना या कार्यक्रमातून थेट दिल्ली व मुंबईकडे रवाना व्हायचे होते, परंतु मग त्यासाठी योग दिनामागे जो स्वच्छ आणि उदात्त हेतू आहे, तो नष्ट करायचा काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, या वेळी स्वत: योगाचार्य रामभाऊ खांडवे हेसुद्धा मंचावर लाल जॅकेटमध्ये योग करताना दिसून आले. त्यामुळे योगा हा कोणत्याही पोशाखात करता येऊ शकतो का? की त्यासाठी काही ‘ड्रेसकोड’ आणि नियम आहेत, यासंबंधी खांडवे यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (प्रतिनिधी)
‘योग’ हा एक व्यायाम आहे. यात आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाची योग्य पद्घतीने हालचाल झाली पाहिजे. त्यासाठी पुरुषांसाठी कुर्ता-पायजामा आणि महिलांसाठी ट्रॅकसूट असा ‘ड्रेसकोड’ असलाच पाहिजे. कुणी जॅकेट किंवा पँटशर्टवर योगा करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते चुकीचे आहे.
- तनू वर्मा, योगाचार्य
‘योग’ कशासाठी?
आजच्या आधुनिक सुविधांनी मनुष्याचे जीवन नक्कीच सुकर केले आहे. मात्र, त्याच वेळी घाई, गडबड, गोंधळ, वेग व ताणतणाव, काळजी, निराशा व उद्वेग यांनी वेढलेल्या माणसाला हृदयरोग, मधुमेह व रक्तदाब अशा रोगांनी त्रस्त केले आहे. या सर्वावर उपाय म्हणजे नियमित योगाभ्यास होय. योगामुळे शरीरासोबतच मनही बलवान होते. त्यामुळेच योगाभ्यासाला भारतीय संस्कृतीत उच्च स्थान आहे.