दंगलीच्या राजकारणाऐवजी समाजकारण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 02:26 AM2016-10-16T02:26:06+5:302016-10-16T02:26:06+5:30
कोपर्डी व तळेगाव घटनेतील आरोपी कोणत्याही समाजाचे असले, तरी त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी़ तळेगावमधील पीडित मुलगी व दंगलीतील जखमींच्या
नाशिक : कोपर्डी व तळेगाव घटनेतील आरोपी कोणत्याही समाजाचे असले, तरी त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी़ तळेगावमधील पीडित मुलगी व दंगलीतील जखमींच्या आर्थिक मदतीसाठी
प्रयत्न केले जातील़ कोपर्डीच्या घटनेनंतर दोन्ही समाजात संघर्ष झाला नाही. मात्र, तळेगावच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला़ या घटनेचे राजकारण कोणी करीत असेल, तर त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारण करावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले़
आठवले म्हणाले, ‘तळेगाव घटनेनंतर ऐक्याचे प्रतीक असलेल्या नाशिक जिल्ह्यात दोन समाजांमध्ये फूट पडली आहे़ दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजांतील १३१ आरोपींना अटक केली असून, त्यापैकी ५३ आरोपींनी केलेल्या हल्ल्यात
एका समाजातील ९ जण जखमी
झाले आहेत़ हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटीचे आठ गुन्हे दाखल
केले आहेत़’
‘मराठा आरक्षण हे केवळ संविधानाच्या माध्यमातूनच देता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी घटनेत बदल करावा लागणार असून, त्यास आमची तयारी आहे़ तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करावी, त्यातील एस़सी, एस़टी़ ओबीसी यांचे ५० टक्के आरक्षण वगळून उर्वरित २५ टक्के आरक्षण हे मराठा समाज (१६ टक्के) व इतर अल्पसंख्यांकांना (९ टक्के) दिले जावे,’ असेही त्यांनी सांगितले.
भाजपा-आरपीआय युती कायम
भाजपा-शिवसेनेने एकमेकांवर कुरघोडी न करता, आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात व आरपीआयला सोबत घ्यावे़ काही कारणाने सेना-भाजपाची युती झाली नाही, तरी भाजपा-आरपीआय युती कायम राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महामंडळांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करणार असून, त्यामध्ये आरपीआयला स्थान देण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुन्हेगार नगरसेवकाला भेटले
आठवले यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तळेगाव येथील पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली़, तसेच दंगलीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांचीही विचारपूस केली. मात्र, त्यांनी अनेक गुन्हे दाखल असलेला नगरसेवक पवन पवारची घेतलेली रुग्णालयातील भेट चर्चेचा विषय ठरली. पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनातील संशयित, डझनभर गुन्हे दाखल असलेला, दंगलीमध्ये चिथावणी, तसेच घरात अवैध शस्त्रास्त्र बाळगून पोलिसांवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पवारवर गुन्हे नोंदवले आहेत.
शिर्डी ऐक्य परिषद लांबणीवर
मराठा समाजाच्या मोर्चाला ‘मराठा शांती मोर्चा’असे नाव असायला हवे होते़ कोपर्डी व तळेगाव प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे शिर्डीतील ऐक्य परिषद लांबणीवर टाकावी लागल्याचे आठवले म्हणाले.