उद्धव ठाकरेंना सातबारा माहीत आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:03 AM2020-01-04T04:03:01+5:302020-01-04T06:38:52+5:30
या सरकारने कुठलेच नियम पाळले नाहीत; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र
पुणे : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातबारामधील कॉलम काय असतात, ते तरी माहित आहे का, असा खोचक सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाणाऱ्या ठाकरे यांना एका हेक्टरमध्ये किती एकर असतात, एका एकरमध्ये किती गुंठे असतात याचीच माहिती नाही. एफआरपी म्हणजे काय ते माहित नाही, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.
पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची मतदार संघातील प्रश्नांसदर्भात भेट घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, पीक कर्जाची संकल्पनाच ठाकरे यांना कळालेली नाही. सातबारा माहित नाही, बोजा चढणे काय असते ते कळत नाही. अशाातच सर्वच उसणी आश्वासने देण्याचे काम त्याच्याकडून चालू असून सर्व बट्ट्याबोळ चालला आहे. साखरेचा विषय निघाला की जयंत पाटलांकडे पाहणारे व महसूलचा विषय निघाला की बाळासाहेब थोरातांकडे पाहणारे ठाकरे हे केवळ वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मुख्यमंत्री झाले. या सरकारने कुठलेच नियम पाळले नाहीत. किमान बारा जणांचे मंत्रीमंडळ असावे असे घटनेने सांगितले आहे. परंतु, गेली महिनाभर मुख्यमंत्र्यासंह सात जणांच्या मंत्रिमंडळाने कारभार चालवीत सर्व नियम त्यांनी धाब्यावर बसविले आहेत.
‘त्यांना’ एकत्र यावे लागते
कोल्हापूरला शिवसेना काँग्रेसला जाऊन मिळाली यावर पाटील म्हणाले, भाजपला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते यातच आम्हाला आनंद आहे. काँग्रेसकडून होणारा स्वा़ सावरकरांचा अपमान मुख्यमंत्री ठाकरे किती काळ सहन करणार, असा सवाल त्यांनी केला.