कामे १५ जूनपूर्वी करा!
By admin | Published: April 27, 2016 02:10 AM2016-04-27T02:10:17+5:302016-04-27T02:10:17+5:30
सुमारे ६० कोटींची जलसंधारणाची कामे अद्याप कागदावरच असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंगळवारी बैैठक घेऊन ही कामे करण्यास १५ जूनची डेडलाईन दिली.
पुणे : सुमारे ६० कोटींची जलसंधारणाची कामे अद्याप कागदावरच असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी मंगळवारी बैैठक घेऊन ही कामे करण्यास १५ जूनची डेडलाईन दिली. जर, दुर्लक्ष झाले तर वेळ पडल्यास ठेकेदारांवर कारवाईचा इशाराही या वेळी त्यांनी दिला.
गेल्या आर्थिक वर्षातील वळण बंधारे, केटी बंधारे, सिमेंट बंधारे, पाझर तलाव, तसेच जलयुक्त शिवारची सुमारे ५८ कोटी २९ लाखांच्या ४१४ कामांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. मात्र, मार्च संपला तरी ही कामे कासवगतीने सुरू आहेत. यातील २०१ कामांचा कार्यारंभ आदेश दिला आहे. ७३ कामांची निविदा काढली असून, ती ओपन झाली आहेत. ३१ कामांना ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. ९७ कामे अद्याप शिल्लक आहेत.
पावसाळा सुरू होण्यास अवघे दीड ते दोन महिने उरले आहेत. तरीही कामांना गती नाही. जर ही कामे पावसाळ््यापूर्वी झाली नाहीत, तर त्याचा पाणीसाठण्यासाठी काहीही उपयोग होणार नाही. म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मंगळवारी सर्व शाखा अभियंते, उपअभियंता व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला.
आता पावसाळा सुरू होण्यास कमी कालावधी राहिला आहे. ही कामे ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी केली जातात. त्यामुळे ती आत्ताच केली पाहिजेत. ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्या सर्व कामांच्या कार्यारंभ आदेश द्या. १५ जूनपूर्वी कामे मार्गी लावा, असे आदेश कंद यांनी या वेळी दिले.
>वेळेत कामे केली पाहिजेत, तसेच ती दर्जेदारही झाली पाहिजेत. जर ठेकेदारांनी याकडे दुर्लक्ष केले, तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल.
- प्रदीप कंद,
अध्यक्ष जिल्हा परिषद