...तुमच्यात हिंमत आहे का?; संजय राऊतांचा नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:43 AM2023-07-21T10:43:59+5:302023-07-21T10:44:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो असा आरोप राऊतांनी केला.
मुंबई – मणिपूरच्या विषयावर युरोपियन संसदेत चर्चा होते, पण भारतीय संसदेत चर्चा होऊ देत नसतील तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. ७० दिवस मणिपूर अजून शांत करता येत नाही. स्वत:ला विश्वगुरू म्हणवता मणिपूर शांत करा. मणिपूर भारताचा भाग आहे. तेथील लोक देशातील जनता आहे. मणिपूरला महिलांना नग्न करून धिंड काढली जाते. ही देशातील १४० कोटी जनतेसाठी चिंतेची गोष्ट आहे. समान नागरी कायदा आणताय त्याआधी मणिपूरमध्ये कायदा सुव्यवस्था नीट करा. तेवढी हिंमत तुमच्यात आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय स्वार्थ असतो. मोदी स्वार्थाशिवाय काही करत नाही. भाजपा आणि मोदी यांचा काय स्वार्थ आहे हे येणारा काळ ठरवेल. ७० दिवसांनी पंतप्रधान मोदींनी महिलांच्या व्हिडिओवर भाष्य केले. दिल्लीत निर्भया कांड झाल्यानंतर संपूर्ण सरकार हलवून टाकले होते. त्यावेळी भाजपा विरोधात होती. हिंसाचार थांबवता येत नसेल तर ते सरकारचे पूर्णपणे अपयश आहे असा आरोप त्यांनी केला.
दिशाभूल आणि बदनाम करण्याचं काम
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. त्यावर राऊत म्हणाले की, मुंबई कोविड सेंटरने सर्वात उत्तम काम केले. पण विरोधकांच्या पोटात जो गोळा आलेला आहे. त्यामुळे टार्गेट केले जाते. परवा एक महिलेबाबत अश्लिल क्लिप आली ती व्यक्ती फडणवीस, पंतप्रधानांशी जवळीक आहे मग त्यांचा संबंध आहे का? मी इतके भ्रष्टाचाराचे प्रकरणे, पत्रे दिली त्यावर काय कारवाई केली. कोविड काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने लोकांचे जीव वाचले. कोर्टासमोर सगळे सत्य येईल. दिशाभूल करण्यासाठी असे आरोप आणि कारवाई केली जाते असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामावर डाग लावायचे. राधाकृष्ण विखे पाटलांना झाकीर नाईकांकडून किती कोटी आले? इक्बाल मिर्चीला सोडले, आता तुमच्यासोबत आले. दादा भुसे १७८ कोटींचे मनी लॉन्ड्रिंग ते एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आहेत. लोकांचे प्राण वाचवले, त्यामुळे उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचे काम सुरू आहे. २०२४ ला सरकार बदलेल, त्यानंतर ज्यांनी ज्यांनी हे खोटे आरोप केले आहेत. त्रास दिला आहे त्यांना उत्तरे द्यावी लागतील. सरकार बदलणार आहे असा दावाही संजय राऊतांनी केला.
दरम्यानअजित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री होतील, कायदेशीर, घटनात्मक बाबी आम्हालाही कळतात. लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे सत्य शिंदे गटाने स्वीकारले पाहिजे असा टोलाही संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.