चंद्रपूरमधील २२० वाघांना घर देता का घर?; स्थलांतर, कॉरिडोर सुरक्षा हेच पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:49 PM2020-08-23T23:49:02+5:302020-08-23T23:49:17+5:30
२०१८ च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ पैकी १७५वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
गजानन दिवाण
औरंगाबाद : महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे २२० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. निम्मेच वाघ संरक्षित क्षेत्रात आहेत. अशा स्थितीत मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याचा धोका आहे. यावर आता चारच पर्याय मला दिसतात. अधिवास क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करून वाघांचे भक्ष्य वाढविणे, वाघांच्या मार्गातील (कॉरिडोरमधील) अडथळे दूर करणे किंवा वाघांचे स्थलांतर करणे. हे शक्य न झाल्यास शेवटी वाघांच्या संख्येवर नियंत्रणाचा पर्यायदेखील विचारात घ्यावाच लागेल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले.
चंद्रपूरच्या संरक्षित क्षेत्रात व त्याबाहेर किती वाघ आहेत?
२०१८ च्या गणनेनुसार राज्यात ३१२ वाघ असून, यातील अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १६० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. अर्धे म्हणजे ८० वाघ ताडोबा अंधारी या संरक्षित क्षेत्रात असून, उर्वरित ८० वाघ बाहेर आहेत. इथे प्रजनन क्षमता असलेल्या ६३ वाघिणी आहेत. साधारण दोन ते तीन वर्षांनंतर वाघीण बछड्यांना जन्म देते. या गणितानुसार २०१८ नंतर जिल्ह्यात किमान ६० ते ७० वाघांची संख्या वाढू शकेल. म्हणजे सध्या या जिल्ह्यात २२० ते २३० वाघ असू शकतात.
हे वाघ सुरक्षित आहेत का?
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ सुरक्षित आहेतच. मात्र, अर्धे वाघ या प्रकल्पाबाहेर आहेत. इथे शेती, गावे व जंगल असल्याने या परिसरात वाघ आणि माणसाचा संपर्क येतो. अशा स्थितीत नवे क्षेत्र शोधून वाघ इतर ठिकाणी स्वत: स्थलांतरित होतात. ताडोबाच्या दोन्ही बाजूंनी तसे झालेदेखील आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी परिसरात आधी सहसा वाघ दिसत नव्हता. आता तिथे वाघांचे नियमित दर्शन होऊ लागले आहे. मात्र, संरक्षित क्षेत्राबाहेर वाढलेल्या वाघांमुळे माणसांचा होणारा मृत्यू हा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
2018च्या व्याघ्रगणनेनुसार राज्यात ३१२ पैकी १७५वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. दोन वर्षांत यात ५० वाघांची भर पडली आहे. देशभरात संरक्षित क्षेत्राच्या बाहेर १००० वाघ आहेत. ११० एकट्या चंद्रपूरात आहेत. 56% वाघ हाच राज्यातील एकमेव जिल्हा सांभाळतो आहे. 6.09 वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रती चौरस कि.मी. क्षेत्रात आढळतात. मेळघाटात हेच प्रमाण अवघे १.४९ आहे.