दुष्काळ पडणार नसल्याची हमी देता का ?
By Admin | Published: March 17, 2017 11:38 PM2017-03-17T23:38:44+5:302017-03-17T23:38:44+5:30
मुश्रीफ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल : शेतकऱ्यांची दिशाभूल बंद करा
कोल्हापूर : राज्यात दुष्काळ पडणार नाही, गारपीट-अतिवृष्टी होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असतील, तर आत्महत्या करणार नसल्याची हमी शेतकरी देण्यास तयार आहेत. सावकारांची कर्जमाफी करणाऱ्यांना शेतकऱ्यांची दु:खे दिसत नाहीत, बालिश वक्तव्ये करून मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल बंद करावी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला.
कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री विरोधक देणार का? या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत मुश्रीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. एकूण पीक कर्जापैकी ८५ टक्केवाटप जिल्हा मध्यवर्ती बॅँका करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी ही जिल्हा बॅँकेतच राहणार आहे. त्यामुळे अडचणीतील बॅँका वाचविण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करीत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप चुकीचा आहे. खासगी सावकारांना हातभार लावणारे सरकार सहकारी बॅँकांबाबत दुजाभाव करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील निवडणुकीत कर्जमाफीची ग्वाही दिली. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्हाला अडीच वर्षांपूर्वीच पाठबळ दिले. त्यांच्याकडून आत्महत्या करणार नसल्याची खात्री का मागता? शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री मागणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री असतील. अशी हमी मागणाऱ्यांनी पहिल्यांदा दुष्काळाची हमी द्यावी, असेही मुश्रीफ म्हणाले.
कर्जमाफीच द्यायची नसेल तर बदनामी तरी करू नका
राज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफीच द्यायची नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री असे वक्तव्य करीत आहेत. कर्जमाफी द्यायची नसली तरी किमान सहकाराला बदनाम तरी करू नये, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.