माऊंट मेरीच्या जत्रेत 'मेणा’च्या प्रतिकृतीवर बंदी घालायची हिंमत आहे का ? - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 15, 2017 07:53 AM2017-02-15T07:53:03+5:302017-02-15T07:58:37+5:30
माऊंट मेरीच्या जत्रेत सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव श्रीफळ नेण्यास बंदी घालण्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. इतर धर्मीयांचीही प्रार्थनास्थळे मुंबई-महाराष्ट्रात आहेत. म्हणजे माऊंट मेरीच्या जत्रेत भाविक मोठय़ा प्रमाणात मेणबत्त्या किंवा देवीस आवडणारी मेणाची साधने श्रद्धापूर्वक अर्पण करतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव ‘मेणा’च्या प्रतिकृतीवर तेथे बंदी घालण्याची हिंमत आमचे प्रशासन दाखवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
सिद्धिविनायक मंदिरात हार, फुले, नारळावर बंदी म्हणजे बंदी! पोलीस व मंदिराच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय म्हणे मंदिराच्या सुरक्षेसाठी घेतला आहे. श्रद्धा आणि भक्तीवर बंधने लादण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारी तुघलकी कारभार आहे काय? असा प्रश्न मनात येतो. सिद्धिविनायकाचे मंदिर व त्या देवाचे भक्त या दोघांतला हा विषय आहे. सरकारने त्यात टांग अडवून विनाकारण अनेक लोकांचा रोजगार बुडवू नये. देवाचे रक्षण करणे जमत नसेल तर सिद्धिविनायक मंदिराबाहेर फलक लावून तसे जाहीर करा! देवा, सिद्धिविनायका, आता तूच या सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी दे! असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
इतरही अनेक निर्णय जाहीर करून मंदिर प्रशासन जणू ‘नोटाबंदी’ निर्णयाची परंपराच पुढे चालवीत आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळ हे सरकार नेमत असते. त्यामुळे श्रद्धा आणि भक्तीवर बंधने लादण्याचा हा निर्णय म्हणजे सरकारी तुघलकी कारभार आहे काय? असा प्रश्न मनात येतो. मोठय़ा मंदिरांच्या आसपास हार, फुले व नारळ, प्रसाद, तेल, अगरबत्ती विकणाऱ्या असंख्य टपऱ्या वर्षानुवर्षे सुरू आहेत व देवाच्याच कृपेने या नारळ, हार, फुले विकणाऱ्यांची रोजीरोटी सुरू आहे. शेकडो कुटुंबांची गुजराण हार, फुले, नारळ विक्रीवर सुरू आहे. पण नारळ, फुले बंदीने या कुटुंबांचा रोजगार बुडाला आहे. त्यांची भरपाई तुम्ही कशी करणार? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.
मोदी यांच्या ‘नोटाबंदी’ने अनेक लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. लाखोंना रोजगार गमावण्याचा फटका बसला व त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली हे लक्षात घ्यायला कुणी तयार नाही. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे एकहाती सरकार आहे. त्यामुळे भक्तांच्या श्रद्धांना असे तडे देणे त्यांना शोभत नाही. मंदिरांचे संरक्षण हा सरकारी कामाचा एक भाग आहे व त्यासाठी भक्तांना असे गुन्हेगार ठरवण्याचे कारण नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
हाजीअली दर्ग्याच्या बाबतीत तेच म्हणावे लागेल. तेथेही आजूबाजूस जी दुकाने, टपऱ्या व फेरीवाले आहेत ते लोक श्रद्धेचा व्यवहार करून रोजीरोटी चालवतच असतात. अशा गोरगरीबांची रोजीरोटी एका फर्मानाने हिसकावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. नारळ, फुलांतून ‘बॉम्ब’ आत येतील असे ज्यांना वाटते ते येडचाप आहेत असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.