हकालपट्टी केलेल्यांना कारमध्ये घेऊन फिरता का?; शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 02:25 PM2022-12-16T14:25:28+5:302022-12-16T14:26:39+5:30
कालपर्यंत ही सर्व मंडळी तुम्हाला चांगली वाटत होती व तुम्हाला सोडल्यानंतर हे तुम्हाला गुन्हेगार वाटत आहेत असं नरेश म्हस्के म्हणाले.
मुंबई - बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे संजय राऊत यांनी संपवलेले आहेत. आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीची लाचारी करायला लावलेली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीचा संजय राऊत यांचा दौरा पाहा व त्यांचे व्हिडिओ पाहा. ही सर्व मंडळी संजय राऊत त्यांच्या आजूबाजूला होती जर तुम्ही त्यांची हकालपट्टी केली होती तर कारमध्ये घेऊन का फिरत होते असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले की, गेल्या आठवड्यातच नाशिककर संजय राऊत यांचे बारा वाजवणार असं सांगितलं होतं व त्यांना क्लीन बोल्ड करणार. चार टप्पे बॉलवर त्यांची विकेट गेली होती. आज नाशिक मधील १२ नगरसेवकांनी 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड करण्यासाठी सुरुवात केली आहे. आज आपण पाहिलं रोज सकाळी भोंगा राष्ट्रवादीच्या स्क्रिप्टनुसार वाजतो. त्याचा आवेश कमी झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत जेव्हा नाशिक दौऱ्यावरती होते तेव्हा अजय बोरस्ते यांच्या बरोबर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व नगरसेवक आलेले आहेत असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना दलाल कॉन्ट्रॅक्टर असे सर्व वाटू लागले आहेत. कालपर्यंत ही सर्व मंडळी तुम्हाला चांगली वाटत होती व तुम्हाला सोडल्यानंतर हे तुम्हाला गुन्हेगार वाटत आहेत. संजय राऊत तुम्हीही दुटप्पी भूमिका सोडून द्या, शिवसेनेची वाताहत तुमच्यामुळे झाली आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेला पक्ष हिंदुत्ववादी विचार सोडून द्यायला तुम्ही लावलं आणि शिवसेना पक्ष तुम्ही लाचार करण्याचं काम केलं असा आरोप नरेश म्हस्केंनी केला.
दरम्यान, तुमच्यासोबत होते तोपर्यंत चांगले आणि आता सोडलं तर वाईट. हे फक्त १२ नगरसेवकच नाही तर ३२ नगरसेवक आहेत. त्या ३२ नगरसेवकांमधला बारा नगरसेवकांचा पहिला टप्पा होता. दुसरा टप्पा काही दिवसात तुम्हाला दिसेल व त्या ठिकाणी किती शिल्लक राहतील हे २०२४ पर्यंत पाहा. तुम्हाला औषधाला सुद्धा माणूस या ठिकाणी सापडणार नाही असा इशारा नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना दिला.